पायाच्या तळव्यांची सतत आग होतेय? काशाची वाटी देईल मिनिटांत आराम 
लाईफस्टाईल

पायाच्या तळव्यांची सतत आग होतेय? काश्याची वाटी देईल मिनिटांत आराम

कांस्य म्हणजे तांबे आणि जस्त मिश्र धातूपासून बनवलेली ही वाटी शरीरातील वाढलेली उष्णता आणि वात कमी करण्यास मदत करते.

Mayuri Gawade

दिवसभरातील धावपळ, उष्णतेचा परिणाम किंवा शरीरातील वात-पित्त वाढल्यामुळे अनेकांना पायांच्या तळव्यांची आग, जळजळ जाणवते. रात्री झोपताना ही समस्या अधिक तीव्र होते आणि शांत झोपही लागत नाही. अशा वेळी तात्पुरत्या उपायांपेक्षा आयुर्वेदाने सांगितलेली काश्याच्या वाटीने पादाभ्यंग ही सोपी, घरच्या घरी करता येणारी आणि परिणामकारक पद्धत काही मिनिटांतच पायांना थंडावा देते.

पूर्वी लग्नाच्या आहेरात हमखास दिली जाणारी काश्याची वाटी म्हणजे केवळ साधं भांडं नव्हे, तर त्यामागे आरोग्यदायी विचार दडलेला आहे. कांस्य म्हणजे तांबे आणि जस्त मिश्र धातूपासून बनवलेली ही वाटी शरीरातील वाढलेली उष्णता आणि वात कमी करण्यास मदत करते.

पादाभ्यंग म्हणजे नेमकं काय?

पायाला तेल किंवा तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला पादाभ्यंग म्हणतात. आयुर्वेदानुसार डोके, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी नियमित पायाला मसाज करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्याचे फायदे:

  • वात कमी होऊन पायाच्या तळव्यांना पडणाऱ्या भेगा, आग किंवा जळजळ कमी होते.

  • पायांजवळ रक्तवाहिन्यांचे जाळे असल्याने या मसाजमुळे संपूर्ण शरीरातील थकवा कमी होतो.

  • शरीरात थंडावा निर्माण होतो आणि ताजेतवानेपणा जाणवतो.

  • डोळ्यांचे आरोग्य पायांशी जोडलेले असल्याने डोळ्यांच्या नसांना चालना मिळते.

  • नियमित पादाभ्यंग केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात येण्यास मदत होते.

मसाज करण्याची योग्य वेळ:

रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शांत आणि गाढ झोप लागते. याशिवाय सकाळी अंघोळीपूर्वी अर्धा तास पादाभ्यंग करणेही फायदेशीर ठरते.

काश्याच्या वाटीने मसाज करताना तेल किंवा तुपाचा वापर आवश्यक आहे.

  • कोमट तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल वापरू शकता.

  • पायांच्या भेगांसाठी भिंडेल (एरंडेल) किंवा कोकम तेल अधिक उपयुक्त ठरतं.

महागड्या स्पा अपॉइंटमेंट्सपेक्षा काश्याची वाटी, थोडंसं तेल आणि काही मिनिटांचा वेळ, एवढ्यातच आयुर्वेदाने दिलेला हा उपाय शरीराला आणि मनाला आराम देतो. रोजच्या धावपळीत हरवलेली शांत झोप आणि ऊर्जा परत मिळवण्यासाठी पादाभ्यंग नक्कीच उपयोगी ठरू शकतो.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. यातून ‘नवशक्ति’ कोणताही दावा करत नाही.)

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय

Mumbai : होळीसाठी लोकलच्या दाराला सुपारीचं झाड बांधून नेणं पडलं महागात; RPF कडून ६ जणांविरोधात गुन्हा