लाईफस्टाईल

गुढी...विजयाची, आणि नवचैत्यन्याची

राजकीय विजयापासून ते सृष्टीच्या नवनिर्मितीपर्यंत विविध गोष्टींचे स्वागत करण्यासाठी ध्वज म्हणजेच गुढी उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात बाराव्या-तेराव्या शतकापासून आढ‌ळते. दक्षिण भारत व शालिवाहन शकाला इ.स. ७८ मध्ये याच दिवशी सुरुवात झाली. संत साहित्यातही गुढीचा उल्लेख आढळ‌तो. संतांसाठी गुढी हे आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे.

राकेश मोरे

- पाऊलखुणा

- राकेश मोरे

राजकीय विजयापासून ते सृष्टीच्या नवनिर्मितीपर्यंत विविध गोष्टींचे स्वागत करण्यासाठी ध्वज म्हणजेच गुढी उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात बाराव्या-तेराव्या शतकापासून आढ‌ळते. दक्षिण भारत व शालिवाहन शकाला इ.स. ७८ मध्ये याच दिवशी सुरुवात झाली. संत साहित्यातही गुढीचा उल्लेख आढळ‌तो. संतांसाठी गुढी हे आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे.

गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा नववर्ष दिन. चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला येणारा हा सण केवळ एक धार्मिक परंपरा नसून त्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभी केली जाते. ‘गुढी’ हा शब्द आणि ‘गुढी’ ही संकल्पना या दोन्ही गोष्टी मराठी संस्कृतीमध्ये किमान बाराव्या-तेराव्या शतकापासून आढळतात. ‘गुढी’ या शब्दाचा एक अर्थ ‘ध्वज’ वा ‘पताका’ हा आहे, यात शंका नाही. फार प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रसंगी ध्वज उभारण्याची प्रथा चालत आली आहे. राजे, सेनापती हे लोक विजय मिळवून परतल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रजाजन ध्वज उभारत असत. त्याखेरीज राज्याभिषेक, सण, उत्सव, आनंदाचा इतर एखादा प्रसंग अशा वेळीही ध्वज उभारले जात असत.

ज्येष्ठ प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या ‘गुढी आणि शिवपार्वती’ या पुस्तकात म्हटले आहे की, “नवीन वर्ष साजरा करण्याच्या त्या-त्या भागातील विविध पद्धती आहेत. कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात याला ‘उगादि’, राजस्थान व हरयाणात ‘बाला थपना’, हिमाचलमध्ये ‘चैत्ती’, तर काश्मीरमध्ये नववर्षाला ‘नवरेह’ म्हणतात. याच दिवशी शालिवाहन शक नावाने कालगणना सुरू झाली. चैत्र म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभी करण्याची पद्धत रूढ झाली. फार पूर्वी कुठल्याही मोठ्या यशप्राप्तीनंतर गुढी उभी केली जाऊ लागली.”

गुढीपाडव्याचा उल्लेख भारतीय संस्कृतीत अनेक ऐतिहासिक दस्तावेजात आढळतो. हा दिवस केवळ नववर्षाची सुरुवात दर्शवणारा नसून, सृष्टीच्या निर्मितीपासून राजकीय विजयांपर्यंत अनेक घटनांशी जोडलेला आहे.

गुढीपाडव्याचा एक ऐतिहासिक संदर्भ शालिवाहन राजाशी जोडलेला आहे. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी ‘शालिवाहन’ हा दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या प्रदेशाचा राजा होता. १९४० वर्षांपूर्वी गौतमीपुत्राने शक राजांचा पराभव करून दख्खनच्या साम्राज्यावर सातवाहनांचे वर्चस्व पुनर्प्रस्थापित केले. आपल्या राजाने विजय मिळवला हे पाहून सर्वांनी घरांसमोर गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली आणि दणक्यात त्यांच्या राजाचं स्वागत केलं, अशी आख्यायिका आहे. नाशिकच्या पांडवलेण्यातील प्रशस्ती शिलालेखात “सातवाहन राजा शालिवाहनने शकांचा पराभव केला” असा उल्लेख आढळतो. परकीय शकावर शालिवाहनांनी विजय मिळविला तो दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो. हा दिवस हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात याच दिवशी शालिवाहन शकाला इसवी सन ७८ मध्ये सुरुवात झाली असून, शालिवाहन हा सातवाहनांचा अपभ्रंश असावा. तसेच त्याचं साम्राज्य हे कोकण ते विदर्भ, माळवा-सौराष्ट्र ते कृष्णा नदीपर्यंत पसरलेलं आहे, असाही उल्लेख या शिलालेखात आहे. त्यामुळे शालिवाहन म्हणजेच सातवाहनाची सत्ता ज्या भागात होती, त्या भागात गुढीची प्रथा सुरू झाली.

गुढीपाडव्याचा उल्लेख केवळ ऐतिहासिक संदर्भांपुरताच मर्यादित नाही, तर तो संत साहित्यातही मोठ्या प्रमाणावर आढळतो. संत साहित्यात गुढी विजय, आनंद, भक्ती, मुक्ती आणि नव्या पर्वाची सुरुवात म्हटली आहे.

“अवधर्माची अवधि तोडी। दोषांची लिहिली फाडी। सज्जनाकरवी गुढी। सुखाची उभवि।।"

संत ज्ञानेश्वरांनी (१२७५-१२९६) गुढीचा उल्लेख अधर्माचा अंत आणि सत्याचा विजय म्हणून केला आहे. गुढी उभारणे म्हणजे अधर्म संपवून धर्माची स्थापना करणे, असे ते सांगतात. त्यांनी म्हटले की, सज्जन व्यक्तींनी गुढी उभारून नव्या युगाची सुरुवात करावी, जिथे सुख आणि समाधान नांदेल.

“टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची।।”

संत चोखामेळा (१२७०-१३५०) यांनी या अभंगात गुढीचा उल्लेख केला आहे. त्यांच्या अभंगातून गुढी उभारणे ही केवळ पारंपरिक प्रथा नसून, ती आध्यात्मिक मार्गाचा एक भाग असल्याचे दिसते. या अभंगात चोखामेळा सांगतात की, “टाळ वाजवत, भक्तीच्या मार्गाने गुढी उभारावी आणि पंढरपूरच्या वाटेवर चालावे.” याचा अर्थ गुढी ही परमेश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारे एक प्रतीक आहे.

“चौक रंगमाळीका भरविलिया, गुढी उभविली।।”

म्हाइंभट रचित लिळाचरित्र (१२७८-१३००) ग्रंथामध्येही गुढीचा उल्लेख आला आहे. या ग्रंथात गुढी उभारण्याची परंपरा आणि त्याचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले आहे. गुढी उभारणे हा विजय आणि आनंद साजरा करण्याचा भाग आहे, असे यात सांगितले आहे.

“पुढे पाठविले गोविंदा गोपाळा देऊनी चपळा, हाती गुढी।।”

संत तुकारामांच्या (१६०८-१६५०) अभंगांमध्ये गुढीचा उल्लेख भक्ती आणि ईश्वरप्रेम यांच्याशी जोडलेला आहे. गुढी उभारणे म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी पुढे जाणे आणि भक्तीचा विजय साजरा करणे, असे ते सांगतात.

संतांच्या अभंगांमधून दिसते की, गुढी ही नव्या युगाची सुरुवात, विजयाचा उत्सव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. म्हणूनच गुढी उभारणे ही केवळ परंपरा नसून, संपूर्ण समाजाला चांगल्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देणारी एक संकल्पना आहे.

गुढीपाडव्याचा उल्लेख प्राचीन काळापासून अनेक मध्ययुगीन ऐतिहासिक संदर्भांमध्ये आढळतो. गुढीपाडवा हा केवळ नववर्षाची सुरुवात एवढ्या पुरताच नसून, राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या शुभ मुहूर्त मानला जात असे. शिवकालीन कागदपत्रांमध्ये आणि ऐतिहासिक साधनांमध्येही याचा उल्लेख आहे.

१६७४ मध्ये रायगडावरील गुढीपाडवा उत्सवाचा उल्लेख आढळतो. ‘शिवकालीन पत्रसार संग्रह (खंड २)’ मधील एका पत्रातून स्पष्ट होते की, शिवाजी महाराजांच्या दरबारात गुढीपाडवा साजरा केला जात असे. या पत्रामध्ये इंग्रज दुभाषी नारायण शेणवी सांगतो की, मंगळवार, २४ मार्च १६७४ रोजी रायरी (रायगड) येथे पोहोचलो. त्याच दिवशी निराजी पंडिताची भेट घेण्यासाठी पाचाड गावी गेलो. तेव्हा समजले की, निराजी गडावर आहे. मध्यंतरी तो गुढीपाडव्याच्या सणासाठी (२८ मार्च १६७४) आपल्या घरी आला.

या पत्रावरून हे स्पष्ट होते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण मानला जात असे. शिवकालीन समाजात गुढी उभारणे ही परंपरा होती आणि मराठा सरदार व अधिकारी आपल्या घरी हा सण साजरा करत असत.

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध’ (पृष्ठ १३५०) या ग्रंथानुसार, छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर, महाराणी ताराबाई यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या काळात मुघल साम्राज्याच्या विरोधात मराठे संघर्ष करत होते आणि त्या परिस्थितीत गादीच्या सातत्याची गरज होती. त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी मुद्दाम चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, १० मार्च १७०० रोजी आपले चिरंजीव दुसरे शिवाजी यांचे मंचारोहण केले.

गुढीपाडवा केवळ धार्मिक सण नसून, तो ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे, हे शिवकालीन संदर्भांवरून स्पष्ट होते. मराठा साम्राज्यात गुढी उभारणे विजयाचे आणि नव्या युगाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जात असे. महाराणी ताराबाई यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच आपल्या मुलाचे राज्यारोहण घडवून आणले, यावरून गुढीपाडव्याला केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्वही होते. शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातील मराठा प्रशासनात गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा सण होता.

प्राचीन काळापासून या दिवशी गुढी उभारून नव्या युगाच्या प्रारंभाचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या काळातही गुढीपाडव्याचा संदेश तोच आहे - नवीन सुरुवात, सकारात्मकता आणि विजय. इतिहास साक्षी आहे की, हा दिवस नेहमीच परिवर्तनाचे आणि विजयाचे प्रतीक राहिला आहे. सातवाहन राजाच्या विजयापासून ते महाराणी ताराबाई यांच्या निर्णायक क्षणांपर्यंत. म्हणूनच या वर्षी गुढीपाडव्याला नवा उत्साह, नवा संकल्प आणि नव्या यशाची गुढी उभी करूया!

rakeshvijaymore@gmail.com

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक