फक्त २० मिनिटांत बनवा क्रीमी पालक सूप; जाणून घ्या सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

फक्त २० मिनिटांत बनवा क्रीमी पालक सूप; जाणून घ्या सोपी रेसिपी

पालकाची चव, दुधाचा क्रीमी पोत आणि वरून चीज यामुळे हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकते.

किशोरी घायवट-उबाळे

गरमागरम सूपचा आस्वाद घेण्याची मजाच काही और असते. सूप केवळ पोट भरणारे नसून त्यात भाज्या आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश करता येतो. त्यातही पालकाचे सूप हा आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे. क्रीमी पालक सूप घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येते. पालकाची चव, दुधाचा क्रीमी पोत आणि वरून चीज यामुळे हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकते. संध्याकाळच्या वेळी किंवा हलक्या जेवणासाठी हे सूप नक्की करून पाहा.

साहित्य :

  • २ कप चिरलेली पालकाची पाने

  • १ कप पाणी

  • २ टेबलस्पून स्प्रिंग अनियन

  • १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल

  • १/२ टीस्पून ओरेगानो

  • १ कप दूध

  • चवीनुसार मीठ

  • चवीनुसार काळी मिरी

  • ब्रेड क्रुटॉन्स

  • किसलेले चीज

कृती :

पालकाची प्युरी तयार करण्यासाठी :

एका भांड्यात पाणी गरम करून त्यात चिरलेला पालक घाला. पालक मऊ होईपर्यंत तो उकळून घ्या. उकडलेला पालक आणि त्यातील पाणी ब्लेंडरमध्ये घेऊन बारीक प्युरी करून घ्या.प्युरी अधिक गुळगुळीत हवी असल्यास ती गाळून घ्या.

सूप तयार करण्यासाठी :

नॉन-स्टिक भांड्यात ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात ओरेगानो आणि स्प्रिंग अनियन घालून साधारण अर्धा मिनिट परतून घ्या. त्यात तयार केलेली पालकाची प्युरी घाला. आता दूध, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घालून सर्व मिश्रण नीट ढवळा. हे मिश्रण साधारण दोन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. सूपला उकळी येण्यापूर्वी आच नियंत्रित ठेवा.

सर्व्ह करण्याची पद्धत :

गरमागरम पालक सूप बाऊलमध्ये ओता. त्यावर किसलेले चीज आणि ब्रेड क्रुटॉन्स घालून सजवा. थंडीच्या दिवसांत हे सूप गरमागरम सर्व्ह करा.

सूप बनवताना लक्षात ठेवा

  • पालक जास्त वेळ उकळू नका; तो मऊ झाला की लगेच प्युरी करा.

  • सूप अधिक क्रीमी हवे असल्यास दुधाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडे वाढवू शकता.

  • सूपला अधिक चव आणण्यासाठी काळी मिरी आणि ओरेगानोचे प्रमाण आवडीनुसार बदलता येते.

  • क्रुटॉन्स आधीच घातल्यास ते नरम होऊ शकतात. त्यामुळे सर्व्ह करण्याच्या अगोदरच ते घाला.

  • चीजचे प्रमाणही आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करता येईल.

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक

SEBI कडे ९ कंपन्यांचे आयपीओसाठी अर्ज