'एआय'ने बनविलेली प्रतिमा 
लाईफस्टाईल

‘डिलिव्हरी बॉक्स’ असाच फेकाल, तर स्कॅमरच्या तावडीत सापडाल; शिपिंग लेबलवरील वैयक्तिक माहिती काढून टाका

सगळेच सायबर घोटाळे हॅकिंगमुळे होत नसतात. काही घोटाळे आपल्या दैनंदिन सवयींमुळेही होऊ शकतात. शिपिंग लेबल न काढता एखादा ‘डिलिव्हरी बॉक्स’ फेकून देण्याने काय नुकसान होणार, असे आपल्याला वाटू शकते, पण तसे केल्याने तुमचे नाव, फोन नंबर आणि पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील उघड होतात आणि सायबर गुन्हेगार...

रवींद्र राऊळ

मुंबई : सगळेच सायबर घोटाळे हॅकिंगमुळे होत नसतात. काही घोटाळे आपल्या दैनंदिन सवयींमुळेही होऊ शकतात. शिपिंग लेबल न काढता एखादा ‘डिलिव्हरी बॉक्स’ फेकून देण्याने काय नुकसान होणार, असे आपल्याला वाटू शकते, पण तसे केल्याने तुमचे नाव, फोन नंबर आणि पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील उघड होत असल्याने सायबर गुन्हेगार त्याचा वापर करून स्वतः तुमच्याकडून आणखी संवेदनशील डेटा काढून घेऊ शकतात. अशा धोक्यांपासून सावध राहणे ही सुरक्षित राहण्याची पहिली पायरी आहे.

प्रत्येक ‘डिलिव्हरी बॉक्स’वर तुमचे नाव, पत्ता आणि फोन नंबर अशी काही महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते. सायबर गुन्हेगार बऱ्याचदा असे फेकून दिलेले बॉक्स कचऱ्याच्या डब्यातून गोळा करतात आणि त्याच्यावरील माहितीचा उपयोग कुरियर एजंट किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून बतावणी करण्यासाठी करतात. त्यांच्याकडे पुरेसा डेटा गोळा झाल्यानंतर त्यांचे संभाषण खरे वाटते आणि मग घोटाळा होतो. जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी ‘फेडएक्स’ने याबाबतच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.

तुमची माहिती मिळवल्यावर, घोटाळेबाज तुम्हाला घातक लिंक किंवा ‘क्यूआर कोड’सह खोटा डिलिव्हरी किंवा रिफंड मेसेज पाठवू शकतात. कुरियर एजंट म्हणून तुम्हाला कॉल करू शकतात आणि तुमच्याकडून ओटीपी किंवा काही वैयक्तिक माहिती मागू शकतात. तुम्हाला बनावट पडताळणी पत्रके भरण्यास सांगू शकतात.

अशा संशयास्पद लिंकवर क्लिक केल्याने किंवा अज्ञात क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे मालवेअर हल्ले किंवा आर्थिक घोटाळा होऊ शकतो. एका साध्या बॉक्स लेबलपासून सुरू झालेला हा प्रकार मोठ्या गुन्ह्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ‘डिलिव्हरी बॉक्स’ आहे तसा फेकण्यापूर्वी, थांबा आणि विचार करा आणि मगच फेका.

या डिजिटल युगात, भौतिक कचराही सायबर गुन्ह्यासाठी मदतरूप ठरू शकतो. सावध राहून आणि वैयक्तिक डेटा आपण कसे हाताळतो याबाबतीत सजगतेने बदल करून तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण करू शकता.

काय कराल?

-‘डिलिव्हरी बॉक्स’ची योग्य विल्हेवाट लावा : बॉक्स फेकण्यापूर्वी त्यावरील शिपिंग लेबल काढून टाका.

-तुमचे नाव, फोन नंबर आणि पत्ता यावर एखाद्या मार्करने काळे करा.

-लेबल्स फेकताना सावध : लेबल्स फाडून त्याचे छोटे छोटे तुकडे करा.

काय टाळाल?

-अनाहुत कॉलना प्रतिसाद देऊ नका : संभाषणापासून नेहमी सावध राहा.

-मेसेजवर आंधळा विश्वास ठेवू नका : अधिकृत ग्राहक सेवा चॅनलच्या मदतीने संशयास्पद मेसेज किंवा कॉल तपासून बघा.

-स्रोत तपासा : खात्री केल्याशिवाय कधीही पैसे ट्रान्स्फर करू नका किंवा ओटीपीसहित कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती