लाईफस्टाईल

आनंदी देशाच्या अंतरंगात डोकावताना

२०२४ मध्ये सातव्यांदा जगातला सर्वात आनंदी देश ठरण्याचा बहुमान फिनलंड देशाने पटकावला आहे. या देशात असं नेमकं काय आहे, ज्यामुळे या देशाला हा बहुमान वारंवार मिळतो, हे जाणून घ्यायच्या उत्सुकतेने जेव्हा या देशाकडे पाहिले तेव्हा अनेक अनोख्या गोष्टी समोर आल्या. या आनंदाला असलेली दु:खाची किनारही जाणवली. नुकत्याच झालेल्या २० मार्च या आंतरराष्ट्रीय आनंदी दिनाच्या निमित्ताने फिनलंड देशाचे हे अंतरंग.

नवशक्ती Web Desk

- भटकंती

- दीपक मच्याडो

२०२४ मध्ये सातव्यांदा जगातला सर्वात आनंदी देश ठरण्याचा बहुमान फिनलंड देशाने पटकावला आहे. या देशात असं नेमकं काय आहे, ज्यामुळे या देशाला हा बहुमान वारंवार मिळतो, हे जाणून घ्यायच्या उत्सुकतेने जेव्हा या देशाकडे पाहिले तेव्हा अनेक अनोख्या गोष्टी समोर आल्या. या आनंदाला असलेली दु:खाची किनारही जाणवली. नुकत्याच झालेल्या २० मार्च या आंतरराष्ट्रीय आनंदी दिनाच्या निमित्ताने फिनलंड देशाचे हे अंतरंग.

जगातील सर्वात आनंदी देश म्हणून फिनलंड या देशाची गणना होते. सर्वसामान्य पर्यटकांच्या यादीमध्ये तसा फिनलंड या देशाचा प्राधान्यक्रम नसतो. कारण ‘आनंदी राष्ट्र’ हा काही पर्यटनाचा विषय होऊ शकत नाही. मी आणि माझी पत्नी तिथे गेलो. कारण आमचा धाकटा मुलगा फिनलंडचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर, ताम्परे येथे कामानिमित्त राहत आहे म्हणून. चांगल्या महिन्याभराच्या वास्तव्यानंतर फिनलंडमधील लोक खरोखरच आनंदी आहेत का, त्यांच्या आनंदाची नक्की मानके काय आहेत आणि आपल्या भारतीयांच्या आनंदी जीवनाच्या संकल्पनेशी ती जुळतात का, याबाबतचं एक वस्तुनिष्ठ मूल्यमापन आम्हाला करता आलं.

अपार शिस्त, नियोजन, स्वच्छता आणि मनाला भुरळ घालणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे दर्शन आम्हाला तेथे पाय टाकता क्षणीच झालं. हेलसिंकी या त्यांच्या राजधानीच्या शहरात उतरल्यानंतर ताम्परे शहरात जाण्यासाठी विमानतळाच्या बाहेरच असलेल्या बस-स्टॅन्डवर फिन-एअरची बस उपलब्ध होती. त्या बसच्या महिला चालकाने आमच्या बॅगा स्वतः उचलून सामानकक्षात ठेवून दिल्या. वेळेवर नियोजित समयी बस सुटली आणि खाचखळगे नसलेल्या रस्त्यावरून वेगाने निघाली. रस्ता मोकळा होता. पण म्हणून नियोजित वेगापेक्षा अधिक वेग घेण्याचा प्रयत्न झाला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत दिसत असलेल्या निसर्गसौंदर्याने मी भारावून गेलो. त्या दोन तासांच्या प्रवासात फर्न प्रजातीच्या लाखाहून अधिक झाडांचं दर्शन झालं. साडेसहाच्या ठरलेल्या वेळेला बस ताम्परेला पोहोचली. या देशाच्या वक्तशीरपणाची पहिली प्रचिती आली. पुन्हा उतरून त्या महिला बसचालकाने आमच्या बॅगा सामानकक्षामधून काढून हसतमुख चेहऱ्याने आमच्या हवाली केल्या. स्त्री सक्षमीकरण म्हणजेच स्त्री ही शारीरिक आणि मानसिक अशा सर्वच बाबतीत कशी सक्षम आहे, पुरुषासमान आहे याचेच ते प्रतीकात्मक उदाहरण होते.

शिक्षणाची जबाबदारी सरकारचीच

फिनलंड हे एक ‘वेल्फेअर स्टेट’ आहे. तेथील कोणत्याही नागरिकाला आपल्या उदरनिर्वाहाची, स्व-शिक्षणाची, मुलाबाळांच्या शिक्षणाची किंवा वैद्यकीय सुविधांविषयी किंचितही चिंता करावी लागत नाही. जगातील सर्वात श्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या व मोफत असणाऱ्या फिनिश शिक्षण व्यवस्थेद्वारे शिक्षण पूर्ण झाल्यावरदेखील नोकरी मिळत नसेल तर मिळणारा बेरोजगार भत्ता हा भारतातील एखाद्या आयटी अभियंत्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक असतो. अपत्यांची संख्या किती, ती लग्न बंधनातील आहेत का विवाहबाह्य संबंधातील, याचा विचार न करता सर्वांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच असते.

नागरी सोयीसुविधा

खाच-खळग्यांचा लवलेशही नसलेले सुंदर-रेखीव रस्ते, त्यावर वक्तशीरपणे तंतोतंत वेळापत्रकानुसार चालणाऱ्या ट्राम्स आणि बसेस, ना त्यात गर्दी ना धावपळ! प्राममध्ये बालक घेऊन बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यास तिकीट नसते. मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूस सहा-सहा फूट रुंदीचे सायकल ट्रॅक आणि तितकेच रुंद पदपथ असतात. सगळीकडे अपार स्वच्छता. नळातले पाणी हे पिण्यासाठी योग्यच असते. वॉटर फिल्टर वगैरेची कटकट नाही. संपूर्ण देशात सुंदर हिरवागार निसर्ग आणि असंख्य स्वच्छ जल असलेले तलाव आहेत.

वृत्तीतील सेवाभाव

देश सुखी होण्याकरिता फक्त सरकारनेच सुविधा देणे पुरेसे नसते. तर नागरिक, सेवा पुरविणारे कर्मचारी यांच्यातही कर्तव्याची, सेवेची भावना जागृत असावी लागते. एके ठिकाणी बसचा रॅम्प स्वयंचलितरीत्या बाहेर पडत नव्हता. एका व्हीलचेअरवर असलेल्या प्रवाशाला बसमध्ये चढणे जिकिरीचे वाटत होते, तेव्हा बसचालक स्वतः बाहेर येऊन तो रॅम्प ओढून त्या प्रवाशाची चढण्याची व्यवस्था करतो. ताम्परे ते हेलसिंकी या २०० कि.मी. लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेगाडीमध्ये चक्क लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा आहे, ज्यात घसरगुंडी वगैरे आहे.

आजीवन शिक्षण

जेथे मुलगा राहत होता त्या इमारती सुद्धा अत्यंत नीटनेटक्या होत्या आणि आजूबाजूला हिरवळच हिरवळ नजरेत येत होती. घरापासून दोन्ही दिशेला पाच-दहा मिनिटे चालण्याच्या अंतरावर दोन प्रचंड मोठे तलाव होते. प्रत्येक वसाहतीच्या आसपास मैदानी खेळांसाठी अद्ययावत मैदाने होती. शिक्षण हा फिनिश कल्याणकारी राज्य (वेल्फेअर स्टेट) संकल्पनेचा एक मूलभूत घटक आहे, एक पाया आहे. फिनिश शिक्षण प्रणाली ही ‘आजीवन शिक्षण’ या तत्त्वावर चालते. कुठलीही पदवी अथवा पदविका ही शिक्षणाची अंतिम सीमा मानली जात नाही. फिनलंडमधील शिक्षण विनामूल्य आहे आणि सामाजिक समानतेला ते प्रोत्साहन देते.

पुस्तकं आणि संगीताचे ग्रंथालय

आम्ही ताम्परे शहराच्या मध्यभागी असलेले वाचनालय बघायला गेलो तेव्हाच तिकडच्या सुविधा बघून चक्रावून गेलो होतो. ही लायब्ररी फक्त पुस्तकांचीच नव्हे तर दुर्मिळ अशा संगीताच्या सीडीज‌्ही तिथे होत्या. संगीताची वाद्यसुद्धा या लायब्ररीत असतात जी इयरफोन लावून आपण वाजवू शकतो. लायब्ररीत अद्ययावत असे रेकॉर्डिंग रूम उपलब्ध आहेत जिथे तुम्ही संगीत ध्वनिमुद्रित करू शकता. तिथे प्रत्येक शहरात अशी अनेक वाचनालयं आहेत. परंतु खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटवते ती हेलसिंकीची मुख्य लायब्ररी. ओडी (Oddi) या नावाने ओळखली जाणारी हेलसिंकी सेंट्रल लायब्ररी ही शहराच्या अगदी मध्यभागी, फिनिश लोकसभेच्या इमारतीच्या समोर वसलेली आहे. संसदेच्या समोरील ‘ओडी’चे हे स्थान हे सरकार आणि नागरिक यामधील संबंधांचे प्रतीक म्हणून निवडले गेले आहे. आजीवन शिक्षण, सक्रिय नागरिकत्व, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना चालना देण्यासाठी ग्रंथालये निर्माण करणे हे सरकारचे काम मानले जाते.

वैयक्तिक गोपनीयतेचा अतिरेक

सर्व मूलभूत गरजांची काळजी घेतली जात असेल, जीवनात सुरक्षितता असेल तर मनुष्य पूर्णपणे सुखी राहतो ही संकल्पना गृहीत धरली जाते. पण खरोखरच याला सुख म्हणता येईल का? कारण या आनंदी देशात आत्महत्या करणाऱ्यांची टक्केवारी हीदेखील जागतिक स्तरावर अव्वल आहे. सर्व सुखसोयी हाताशी असताना असे नैराश्य समाजात का असावे? याला कारण आहे ‘वैयक्तिक गोपनीयता’ (प्रायव्हसी प्रोटेक्शन) या विषयाला दिलेले अतिरेकी महत्त्व! येथील जनमानसांत एकमेकांशी मिसळणे, मैत्री करणे, या गोष्टींमुळे त्यांच्या वैयक्तिक अवकाशाचे (पर्सनल स्पेस) उल्लंघन होते, असे मानले जाते. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपलं खासगीपण सांभाळत असते. तुम्ही ऑफिसमध्ये घनिष्ठ सहकारी असाल, पण या कार्यालयीन सहवासाचे फारच क्वचित मैत्रीमध्ये रूपांतर होते. कदाचित म्हणूनच इथे प्रत्येकाबरोबर कुत्रा हा पाळीव प्राणी दिसतोच. मानवी मैत्रीच्या बाबतीतली कमतरता कुत्र्यांच्या संगतीने भरून निघत असते.

आपल्याकडे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, हा सहजतेने येणारा गुणधर्म आहे. तिकडे मात्र तो प्रत्येक व्यक्तीने स्वत:भोवती बांधलेल्या आभासी कुंपणामुळे आचरणात आणता येत नाही. त्यांना यात रस नसतो, असे मुळीच नाही, पण समोरची व्यक्ती आपल्या भावनिक अभिव्यक्तीचा कितपत स्वीकार करेल याची त्यांना खात्री नसते. खासगी विश्वात गुरफटलेल्या समाजाला एकलकोंडेपणा न जाणवला तरच नवल.

आपण भारतीय बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीय तेढ, पायाभूत सुविधांचा अभाव यांनी त्रस्त असतो. पण तरीही जेव्हा सण, लग्नसराई आणि इतर समारंभात आपण सर्व काही विसरून दिलखुलासपणे गातो-नाचतो, तेव्हा त्या काळापुरता तरी जीवनाचा खराखुरा आनंद उपभोगत असतो.

deepak.machado@yahoo.com

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री