दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाचा सुगंध, गोडधोड पदार्थांचा मोह आणि सतत सुरू असलेले जेवणाचे कार्यक्रम.पण याच काळात अनेकदा आपल्या आरोग्याची तारांबळ उडते. सणाचा आनंद घेताना जर तुम्ही अति खाल्लं, तर ते पचनसंस्थेवर ताण आणू शकतं. त्यामुळे दिवाळीत स्वादही घ्या आणि संतुलनही राखा, असं तज्ज्ञांचं आवाहन आहे.
जास्त खाल्ल्याने होणाऱ्या समस्या
दिवाळीच्या काळात तेलकट, मसालेदार आणि गोड पदार्थांचा भरणा होतो. पण या पदार्थांचं अति सेवन केल्याने गॅस, पोटफुगी, अपचन, आम्लपित्त, शुगर वाढणे अशा तक्रारी सामान्य आहेत. विशेषत: मधुमेह, हृदयरोग, आणि पचनसंस्थेच्या समस्या असलेल्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
तज्ज्ञ सांगतात की, साखरेचे प्रमाण अचानक वाढल्यास शरीरातील ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने बदलते, ज्याचा थेट परिणाम हृदय आणि पचनसंस्थेवर होतो. तसेच तळलेले आणि मसालेदार पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि रक्तदाब अस्थिर करतात.
सणाचा आनंद घेतानाही पोट बिघडू नये यासाठी काही सोपे उपाय
हळूहळू आणि मनापासून जेवा
अनेकदा सणाच्या गडबडीत आपण जेवताना घाई करतो. पण हळूहळू, शांतपणे आणि पूर्ण अन्न खाल्ल्यास ते पचायला सोपं जातं. मेंदूला पोट भरल्याचं कळायला सुमारे २० मिनिटं लागतात. त्यामुळे हळूहळू खाल्ल्याने जास्त खाणं टाळता येतं.
जेवणामध्ये अंतर ठेवा
एकाच दिवशी वारंवार जड जेवण केल्याने पचनसंस्था विस्कटते. जर सकाळचं आणि दुपारचं जेवण जड असेल, तर रात्री हलकं जेवण करा. यामुळे शरीराला पचनासाठी वेळ मिळतो आणि अपचन किंवा अॅसिडिटी टाळता येते.
टीव्ही-मोबाईल पाहत जेवण टाळा
जेवताना मोबाईल किंवा टीव्हीकडे लक्ष देणं ही सवय अपायकारक आहे. या विचलनामुळे आपण किती खाल्लं हे लक्षात राहत नाही आणि अति खाण्याची शक्यता वाढते.
भूक भागवण्यासाठी हेल्दी स्नॅक्स निवडा
सणात मिठाईचा मोह होतोच, पण त्या ऐवजी भाजलेले चणे, मखाणे, ओट्स, अंकुरलेले मूग, भिजवलेले काजू असे स्नॅक्स निवडल्यास पोट भरते आणि अनारोग्यकारक अन्नाची लालसा कमी होते.
फळांचा समावेश करा
सफरचंद, पपई, डाळिंब आणि एवोकॅडो यांसारखी फळं पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पोट भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार खाण्याची गरज कमी होते.
पुरेसं पाणी प्या
पचनासाठी आणि शरीरातील संतुलन राखण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्यास जास्त खाणं टाळता येतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
तज्ज्ञांचा सल्ला
“सणात खाण्यापिण्याचा मोह टाळणं अवघड असतं, पण प्रमाणात खाणं हेच खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन आहे. शरीराला जड वाटायला लागलं की लगेच थांबावं. तसेच मधुमेह, रक्तदाब किंवा पचनाच्या तक्रारी असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फराळाचे पदार्थ घ्यावेत,” असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.