दिवाळीचा आठवडा म्हणजे सण, आनंद आणि पार्टींचा हंगाम! घराघरांत रोषणाई, मिठाई आणि नव्या कपड्यांसोबतच उत्साहाने साजरे होणाऱ्या ‘दिवाळी पार्ट्या’ याच काळात रंगात असतात. सामाजिकदृष्ट्या सक्रिय असाल, तर एका सणात तीन-चार वेगवेगळ्या पार्ट्यांची आमंत्रणे मिळणे हे काही नवीन नाही. पण, अचानक आलेल्या अशा आमंत्रणांमुळे तयार होण्यासाठी वेळ न मिळाल्याने अनेकदा केसांच्या समस्येमुळे लूक बिघडतो.
अनेक महिलांची हीच अडचण - पार्टी ठरते तेव्हा केस तेलकट, निस्तेज किंवा कोंड्यामुळे पांढरे पडलेले दिसतात. सलूनमध्ये जाऊन सेटिंग करणे हा उपाय असला तरी, वेळ आणि तयारी नसल्याने ते शक्य होत नाही. अशा वेळी घरीच सलूनसारखा फिनिश मिळू शकतो का? उत्तर आहे हो!
फक्त दोन घटकांमध्ये सलूनसारखा ग्लो
ब्युटी इन्फ्लुएंसर तारिणी पेशवरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सोपी आणि नैसर्गिक हेअर केअर रेसिपी शेअर केली आहे. त्यांच्या मते, फक्त दोन घरगुती घटक नारळाचे तेल आणि मध वापरून केस पुन्हा रेशमी आणि चमकदार बनवता येतात.
कशी कराल हेअर ट्रीटमेंट?
एका लहान वाडग्यात नारळाचे तेल थोडेसे कोमट करून घ्या.
त्यात एक ते दोन चमचे मध मिसळा.
हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत हलक्या हाताने लावा.
केस बांधून एक तास तसेच ठेवावे
नंतर नेहमीच्या शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवून घ्या.
इतकं सोपं! आणि परिणाम मऊ, रेशमी, चमकदार केस जे कोणाचंही लक्ष वेधून घेतील.
नारळ तेलाचे फायदे
कोमट नारळ तेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
ते केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून नुकसान कमी करते आणि केसांना मजबूती देते.
रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ होते.
कोंडा कमी करण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत होते.
मधाचे फायदे
मधामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात.
त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळूवरील खाज, जळजळ आणि संसर्गापासून संरक्षण देतात.
केसांना नैसर्गिक चमक आणि मजबुती मिळते.
नियमित वापराने तुटके, कोरडे केसही मजबूत व गुळगुळीत होतात.
ही घरगुती ट्रीटमेंट फक्त काही मिनिटांत तयार होते आणि सलूनसारखे परिणाम देते. त्यामुळे अचानक आलेल्या पार्टी आमंत्रणासाठी सलूनमध्ये धाव घेण्याची गरज नाही. केसांची काळजी घ्या, आत्मविश्वास ठेवा आणि या दिवाळीत चमकदार लूकसह सगळ्यांचे लक्ष वेधून घ्या!