लाईफस्टाईल

Diwali Special : दिवाळीत मिठाई घेताना सावधान! भेसळ तर नाही ना? 'अशी' करा घरच्या घरी तपासणी

दिवाळी जवळ आली की बाजारपेठा रंगीबेरंगी मिठाई आणि फराळाच्या पदार्थांनी सजतात. एकमेकांना भेटवस्तू म्हणून गोडधोड देण्याची परंपरा जपली जाते. पण या चमकदार मिठाईमागे कधी आरोग्यासाठी ‘विषारी’ वास्तव दडलेले असते, हे अनेकांना ठाऊक नसते.

नेहा जाधव - तांबे

दिवाळी जवळ आली की बाजारपेठा रंगीबेरंगी मिठाई आणि फराळाच्या पदार्थांनी सजतात. एकमेकांना भेटवस्तू म्हणून गोडधोड देण्याची परंपरा जपली जाते. पण या चमकदार मिठाईमागे कधी आरोग्यासाठी ‘विषारी’ वास्तव दडलेले असते, हे अनेकांना ठाऊक नसते. मागील काही वर्षांमध्ये भेसळयुक्त मिठाईमुळे विषबाधेची प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे या दिवाळीत गोडवा उपभोगताना सजग राहणं अत्यावश्यक आहे.

भेसळीचा सापळा

मावा, खवा, पनीर, चक्काचीज हे घटक मिठाईत मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यामध्ये पावडर दूध, डिटर्जंट, स्टार्च, सिंथेटिक रंग, ॲल्युमिनियम वर्ख अशा घटकांची भेसळ करून नफा वाढवला जातो. हे पदार्थ चवीला आकर्षक वाटले तरी दीर्घकाळात यांचा पचनसंस्थेवर, यकृतावर आणि मूत्रपिंडांवर घातक परिणाम होऊ शकतो.

चांदीच्या वर्खामागचं वास्तव

गेल्या काही वर्षांपासून मिठाईवर लावण्यात येणाऱ्या चांदीच्या वर्खामध्ये ॲल्युमिनियमचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. ॲल्युमिनियमयुक्त वर्ख दिसायला सुंदर वाटतो, पण तो शरीरात गेल्यानंतर मेंदू आणि स्नायूंवर परिणाम करू शकतो.

अस्सल चांदीचा वर्ख ओळखण्याचे काही सोपे उपाय

१. वर्ख तळव्यांच्या मधोमध धरून चोळा. जर तो सहज निघून गेला, तर तो अस्सल चांदीचा आहे.
जर गोळा तयार झाला, तर तो ॲल्युमिनियमयुक्त आहे.

२. मिठाईवर हात फिरवा. जर हातावर वर्ख लागला, तर ती भेसळयुक्त आहे. अस्सल चांदी हाताला चिकटत नाही.

घरच्या घरी करा भेसळ चाचणी

मिठाई खाण्याआधी काही सोपे प्रयोग करून भेसळ तपासता येते.

१. वासाची तपासणी : मिठाईचा वास घेऊन पाहा. कृत्रिम सुगंध, आंबट वास किंवा तेलकट वास जाणवला तर ती शंका घ्यावी.

२. रंग तपासा : मिठाईचा तुकडा घेऊन त्यावर काही थेंब हायड्रोक्लोरिक ॲसिड (HCl) टाका. जर रंग जांभळा झाला, तर त्यात मेटॅनील यलो हा कृत्रिम रंग आहे, जो अत्यंत घातक आहे.

३. बुरशी लागलेली मिठाई: जर मिठाईवर बुरशीसदृश थर दिसला, तर ती ताजी नाही.

आरोग्यावर परिणाम

भेसळयुक्त मिठाईमुळे पचनाचे त्रास, उलट्या, जुलाब, चक्कर येणे अशा तात्पुरत्या तक्रारींबरोबरच दीर्घकाळात यकृतदोष, मूत्रपिंडांवर ताण आणि अगदी कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

सुरक्षित पर्याय

  • शक्य असल्यास मिठाई घरच्या घरी बनवा.

  • विकत घेताना नामांकित दुकानांची निवड करा.

  • FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया) परवान्याचा लोगो पाहा.

  • मिठाई विकत घेतल्यावर ती हवाबंद डब्यात साठवा आणि दोन दिवसांच्या आत वापरा.

दिवाळी म्हणजे आनंद, गोडवा आणि आरोग्य यांचा सण. पण भेसळीच्या मिठाईमुळे या गोड सणाचा कडू अनुभव येऊ शकतो. त्यामुळे या वर्षी मिठाई खरेदी करताना केवळ चव नाही, तर तिची सुरक्षितता तपासा. कारण गोडवा तोच खरा, जो आरोग्यदायी आहे!

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद