दर महिन्याला पगारातून कापली जाणारी पीएफची रक्कम सुरुवातीला छोटी वाटते. पण वर्षानुवर्षे जमा होणारा हाच पैसा घर खरेदी, लग्न, शिक्षण, अचानक आलेली आर्थिक अडचण किंवा निवृत्तीनंतर मोठा आधार ठरतो. त्यामुळे EPFOच्या नियमांमध्ये होणारा प्रत्येक बदल थेट नोकरदारांच्या पैशांशी जोडलेला असतो.
EPF, EPS आणि EDLI संदर्भातील २०२६ च्या नव्या व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पीएफमधून गरजेच्या वेळी पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. नॉमिनेशन डिजिटल होणार आहे आणि क्लेम निकाली काढण्यासाठीही ठरावीक मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे, नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण पीएफ काढण्यासाठीची प्रतीक्षा मात्र वाढणार आहे.
त्यामुळे तुमच्या पगारातून दर महिन्याला PF कापला जात असेल, तर हे ८ बदल नेमके काय आहेत आणि त्यांचा तुमच्या पैशांवर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेऊया.
१. पगारातून PF किती कापला जाणार?
सर्वात आधी अनेकांच्या मनात प्रश्न असेल की नव्या नियमांमुळे दर महिन्याला पगारातून कापल्या जाणाऱ्या PFच्या रकमेत बदल होणार का? सध्या तरी या बाबतीत मोठा बदल नाही.
कर्मचाऱ्याचं वैधानिक PF योगदान मूळ वेतनाच्या १२ टक्के इतकं कायम आहे. कंपनीकडूनही नियमानुसार योगदान दिलं जातं.
सध्या १५ हजार रुपयांपर्यंतच्या मासिक वेतनावर अनिवार्य PF योगदानाची वेतनमर्यादा लागू आहे. त्यामुळे या मर्यादेनुसार कर्मचाऱ्याचं योगदान जास्तीत जास्त १,८०० रुपये महिन्याला होतं. काही प्रकरणांमध्ये यापेक्षा जास्त वेतनावरही PF योगदान दिलं जाऊ शकतं.
२. १५ हजार रुपयांची मर्यादा भविष्यात सहज बदलू शकणार
सध्या PFसाठी १५ हजार रुपयांची वेतनमर्यादा महत्त्वाची आहे. पूर्वी ही रक्कम EPF योजनेतच नमूद करण्यात आली होती.
आता मात्र ही मर्यादा केंद्र सरकारकडून वेळोवेळी अधिसूचित केल्या जाणाऱ्या वेतनमर्यादेशी जोडण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर भविष्यात सरकारला ही मर्यादा वाढवायची किंवा बदलायची असल्यास संपूर्ण योजनेत पुन्हा स्वतंत्र बदल करण्याची गरज पडणार नाही.
मात्र, याचा अर्थ १५ हजार रुपयांची मर्यादा आत्ताच वाढली आहे, असा होत नाही.
३. PF मधून पैसे काढण्याचे नियम समजणं होणार सोपं
आजारपणासाठी PF काढायचा असेल तर एक नियम, लग्नासाठी वेगळा, शिक्षणासाठी आणखी वेगळा... अशा अनेक अटींमुळे कर्मचाऱ्यांचा गोंधळ होत असे. आता आंशिक PF काढण्याच्या तरतुदी मुख्यतः तीन श्रेणींमध्ये मांडण्यात आल्या आहेत.
आवश्यक गरजा - आजारपण, शिक्षण आणि लग्न
घराशी संबंधित गरजा - घर खरेदी किंवा त्यासंबंधित पात्र गरजा
विशेष परिस्थिती - नियमांमध्ये नमूद केलेल्या इतर पात्र परिस्थिती
यामुळे कोणत्या कारणासाठी PFमधून पैसे काढता येतील, हे समजून घेणं तुलनेने सोपं होणार आहे.
४. संपूर्ण PF रिकामा करता येणार नाही; २५ टक्के रक्कम राहणार
हा बदल तुमच्या दीर्घकालीन बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पात्र आंशिक काढणूक करताना PF खात्यातील किमान २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच पात्रतेनुसार ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते.
उदाहरणार्थ, तुमच्या PF खात्यात ४ लाख रुपये असतील, तर पात्रता आणि लागू अटींनुसार ७५ टक्क्यांपर्यंत म्हणजे ३ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. उर्वरित १ लाख रुपये खात्यात राहतील.
यामागचा उद्देश गरजेच्या वेळी कर्मचाऱ्याला त्याच्या बचतीचा उपयोग करता यावा, पण निवृत्तीपूर्वी संपूर्ण PF वारंवार काढून खाते रिकामं होऊ नये, हा आहे.
५. आंशिक PF काढण्यासाठी १२ महिन्यांची सेवा
पूर्वी PFमधून पैसे काढण्याच्या कारणानुसार किमान सेवा कालावधी वेगवेगळा होता. काही कारणांसाठी कर्मचाऱ्याला अनेक वर्षांची सेवा पूर्ण करणं आवश्यक होतं. आता पात्र आंशिक काढणुकीसाठी सामान्यतः १२ महिन्यांची सेवा ही समान अट करण्यात आली आहे.
म्हणजे नोकरीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, संबंधित अटी पूर्ण होत असतील तर आजारपण, शिक्षण, लग्न किंवा इतर पात्र कारणांसाठी PFमधून आंशिक रक्कम काढण्याचा मार्ग सोपा होणार आहे.
६. नोकरी सोडली? संपूर्ण PF साठी १२ महिने थांबावं लागणार
नोकरदारांसाठी हा सर्वाधिक लक्षात ठेवण्यासारखा बदल आहे. यापूर्वी नोकरी सोडल्यानंतर सलग २ महिने बेरोजगार राहिल्यास संपूर्ण PF काढण्याची सुविधा होती. नव्या व्यवस्थेनुसार अंतिम सेटलमेंटसाठी ही प्रतीक्षा १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
७. नॉमिनी अपडेट करणं होणार डिजिटल
PF खाते उघडलं, पण नॉमिनी अपडेट करायचाच राहिला... असं अनेकांच्या बाबतीत होतं. पुढे क्लेमच्या वेळी कुटुंबीयांसाठी यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. नव्या व्यवस्थेत ऑनलाइन नॉमिनेशनला औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नॉमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवणं आणि अपडेट करणं अधिक सोपं होईल.
विशेषतः लग्न झाल्यानंतर किंवा कौटुंबिक परिस्थितीत बदल झाल्यानंतर PF खात्यातील नॉमिनीची माहिती योग्य आहे की नाही, हे तपासून घेणं महत्त्वाचं ठरेल.
८. PF क्लेमसाठी २० दिवसांची मुदत
PF क्लेम केल्यानंतर पैसे खात्यात कधी येणार? हा अनेक कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न असतो. नव्या तरतुदीनुसार PF क्लेम २० दिवसांच्या आत निकाली काढण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. योग्य कारण नसताना क्लेमला विलंब झाल्यास १२ टक्के दराने दंडात्मक व्याज देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, विलंबासाठी जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने ही रक्कम संबंधित प्रादेशिक PF आयुक्तांच्या पगारातून वसूल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
नोकरी बदलत असाल तर PF काढायचा की ट्रान्सफर करायचा?
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. नोकरी बदलणं आणि बेरोजगार होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एका कंपनीतून नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होत असाल, तर प्रत्येक वेळी PF काढण्याची गरज नसते. तुमचा UAN वापरून जुना PF नव्या नोकरीशी जोडता किंवा ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे निवृत्तीसाठीची बचत सुरू राहते.
तुमच्या PF खात्यात आता काय तपासायला हवं?
नियम बदलले म्हणून लगेच काही करण्याची गरज असेलच असं नाही. मात्र, तुमचं UAN सक्रिय आहे का, आधार आणि बँक खात्याचे तपशील योग्य आहेत का, नॉमिनी अपडेट आहे का आणि जुन्या नोकऱ्यांचा PF योग्यरीत्या जोडला आहे का, हे तपासून ठेवणं उपयोगाचं ठरेल.
विशेषतः नोकरी सोडण्याचा विचार करत असाल, तर PFची संपूर्ण रक्कम लगेच हातात येईल असं गृहीत धरून पुढचं आर्थिक नियोजन करणं टाळणं महत्त्वाचं ठरेल.
थोडक्यात काय लक्षात ठेवायचं?
नव्या नियमांचा मुख्य उद्देश दोन गोष्टी साध्य करण्याचा आहे. गरजेच्या वेळी PFच्या पैशांपर्यंत पोहोच सोपी करणे आणि त्याचवेळी निवृत्तीसाठी काही बचत सुरक्षित ठेवणे. त्यामुळे आंशिक पैसे काढण्याचे नियम सोपे होत असले, तरी PF हा केवळ आपत्कालीन खर्चासाठीचा पैसा नसून दीर्घकालीन निवृत्ती बचत आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
PF काढण्यापूर्वी किंवा अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या खात्याला लागू असलेल्या अटी अधिकृत EPFO वेबसाइट किंवा पोर्टलवर एकदा तपासून घ्या.