रोजच्या धावपळीत आपण चेहरा, केस आणि त्वचेची जमेल तशी काळजी घेत असतो. मात्र, आपण आपल्या नखांकडे अनेकदा लक्ष देत नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, नखांची स्थिती ही केवळ सौंदर्याशी संबंधित नसून ती शरीरातील अंतर्गत आरोग्याचे महत्त्वाचे संकेत देऊ शकते. नखांवर दिसणाऱ्या रेषा, खाचा, रंगबदल किंवा डाग हे कधी कधी गंभीर आजारांचे लक्षण असू शकतात. त्यामुळे नखांकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
निरोगी नखांची लक्षणे कोणती?
आपली नखे क्युटिकलखालील मुळापासून वाढतात आणि केराटिन या प्रथिनापासून बनलेली असतात.
नखे गुळगुळीत आणि मजबूत असतात.
त्यावर खाचा किंवा खड्डे नसतात.
नखांचा रंग एकसमान असतो.
त्यावर कोणतेही डाग किंवा पट्टे दिसत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, वयानुसार नखांवर उभ्या रेषा (Vertical ridges) दिसणे सामान्य आहे आणि त्या बहुतांश वेळा धोकादायक नसतात. तसेच किरकोळ दुखापतीमुळे नखांवर पांढरे डाग दिसू शकतात, जे नख वाढीसोबत आपोआप नाहीसे होतात.
नखांमध्ये 'हे' बदल दिसल्यास सावध व्हा
संपूर्ण नखाचा रंग बदलणे किंवा नखाखाली काळी रेघ दिसणे
नखांचा आकार वाकडा होणे
नखे अत्यंत पातळ किंवा जाड होणे
नखांवर छोटे खड्डे किंवा खोल खाचा पडणे
नख त्वचेपासून वेगळे होणे
नखांभोवती सूज, रक्तस्राव किंवा वेदना
नखांची वाढ अचानक थांबणे
हे बदल थायरॉईड, अॅनिमिया, फंगल इन्फेक्शन किंवा इतर गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.
नखांची योग्य काळजी कशी घ्यावी?
नखे नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवा.
भांडी घासताना किंवा रसायने वापरताना हातमोजे वापरा.
नखे सरळ कापा आणि टोकांना हलका वळण द्या.
हातांना लोशन लावताना नखांवर व क्युटिकलवरही लावा.
गरज असल्यास नेल हार्डनरचा वापर करा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने बायोटिन (Biotin) सप्लिमेंट घेऊ शकता.
काय टाळावे?
नखे कुरतडणे टाळा
तुटलेले नख ओढून काढू नका, नेलकटरने कापा
अॅसिटोनयुक्त नेल पॉलिश रिमूव्हरचा अतिवापर टाळा
नखांची समस्या दीर्घकाळ असल्यास दुर्लक्ष करू नका
मेनिक्युअर-पेडिक्युअर करताना ही काळजी घ्या
क्युटिकल काढू देऊ नका, कारण ते नखांचे संसर्गापासून संरक्षण करते
पाय धुवण्याच्या टबची स्वच्छता योग्य प्रकारे होते का, याची चौकशी करा
वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे अॅलर्जी होते का, हे तपासा
तज्ज्ञांच्या मते, नखांची थोडीशी काळजी घेतल्यास नखे निरोगी, मजबूत आणि आकर्षक राहतात. यासोबतच शरीरातील संभाव्य गंभीर आजारांचे संकेतही वेळीच ओळखता येतात.