इतकी वर्षे फ्रिज वापरूनही 'या' चुका करताय? वेळीच सुधारा, नाहीतर वाढेल फूड पॉयझनिंगचा धोका! 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

इतकी वर्षे फ्रिज वापरूनही 'या' चुका करताय? वेळीच सुधारा, नाहीतर वाढेल फूड पॉयझनिंगचा धोका!

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना तुम्हीही नकळत चुका करताय का? कोणता पदार्थ कोणत्या शेल्फवर ठेवावा, कोणते पदार्थ दरवाजात ठेवू नयेत आणि अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या.

Mayuri Gawade

फ्रिज म्हणजे अन्नपदार्थ जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी घराघरात वापरलं जाणारं महत्त्वाचं उपकरण. उरलेली भाजी, भात, डाळ, दूध, फळं-भाज्या किंवा पिठाचा गोळा आपण सहज फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवलं म्हणजे प्रत्येक अन्नपदार्थ आपोआप सुरक्षित राहतो, असा समज चुकीचा आहे. पदार्थ किती वेळात फ्रिजमध्ये ठेवला, तो कोणत्या डब्यात ठेवला आणि फ्रिजच्या कोणत्या भागात ठेवला, यावरही त्याची सुरक्षितता आणि ताजेपणा अवलंबून असतो.

अनेकदा आपण सोयीसाठी दूध-दही दरवाजाच्या कप्प्यात ठेवतो, शिजवलेलं अन्न कुठल्याही शेल्फवर ठेवतो किंवा भाज्या पिशवीत तशाच ठेवून देतो. अशा छोट्या चुका अन्न लवकर खराब होण्याचं कारण ठरू शकतात. अन्न योग्य पद्धतीने साठवलं नाही तर त्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.

याच संदर्भात डॉ. शालिनी सिंह-साळुंखे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणता पदार्थ कोणत्या शेल्फवर ठेवावा, याबाबत माहिती दिली आहे. चला, सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना 'या' चुका टाळा

१. शिजवलेलं अन्न कुठेही ठेवू नका

उरलेली डाळ, भाजी, भात किंवा इतर तयार पदार्थ आपण अनेकदा फ्रिजमध्ये मिळेल त्या जागी ठेवतो. मात्र, शिजवलेले आणि लगेच खाता येणारे पदार्थ वरच्या शेल्फवर ठेवणे योग्य ठरते. हे पदार्थ उघड्या भांड्यात न ठेवता हवाबंद डब्यात ठेवावेत. यामुळे पदार्थाचा ताजेपणा टिकवण्यास आणि इतर पदार्थांशी थेट संपर्क टाळण्यास मदत होते.

२. दूध-दही फ्रिजच्या दरवाजात ठेवू नका

फ्रिजचा दरवाजा आपण वारंवार उघडतो-बंद करतो. त्यामुळे दरवाजाच्या कप्प्यातील तापमान सतत बदलत राहतं. म्हणून दूध, दही, पनीर, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ दरवाजात ठेवण्याऐवजी मधल्या शेल्फवर ठेवणे चांगले. यामुळे या पदार्थांना तुलनेने स्थिर थंड तापमान मिळण्यास मदत होते.

३. फळं-भाज्या योग्य कप्प्यात ठेवा

भाज्या आणि फळं फ्रिजमध्ये ठेवताना ती कोणत्याही शेल्फवर ठेवण्यापेक्षा व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये ठेवावीत. हा कप्पा फळं आणि भाज्यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तयार केलेला असतो. भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्या स्वच्छ आणि कोरड्या आहेत याची काळजी घ्यावी. ओलावा जास्त राहिल्यास काही भाज्या लवकर खराब होऊ शकतात.

४. फ्रिजच्या दरवाज्यात काय ठेवायचं?

फ्रिजच्या डोअर शेल्फमध्ये सॉस, जॅम, ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर पेये ठेवता येतात. या पदार्थांवर दरवाजा उघडल्यामुळे होणाऱ्या तापमानातील बदलांचा तुलनेने कमी परिणाम होतो. मात्र, दूध-दही किंवा इतर लवकर खराब होणारे पदार्थ दरवाजाच्या कप्प्यात ठेवणे टाळावे.

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना एवढं लक्षात ठेवा

फ्रिजमध्ये अन्न ठेवण्याचा उद्देश केवळ ते थंड करणं नाही, तर ते योग्य पद्धतीने आणि सुरक्षितरीत्या साठवणं हा आहे. त्यामुळे शिजवलेले पदार्थ हवाबंद डब्यात ठेवणे, दुग्धजन्य पदार्थ योग्य शेल्फवर ठेवणे आणि फळं-भाज्यांसाठी स्वतंत्र ड्रॉवरचा वापर करणे या छोट्या सवयी उपयोगी ठरू शकतात.

एकंदरीत, फ्रिजमध्ये जागा वाचवण्यासाठी पदार्थ कुठेही ठेवण्यापेक्षा प्रत्येक पदार्थासाठी योग्य जागा निवडली, तर अन्नाचा ताजेपणा टिकवण्यास मदत होऊ शकते.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग