Ganeshotsav 2026 : तळलेले मोदक २ दिवस राहतील कुरकुरीत; पिठात मिसळा हा १ पदार्थ 
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2026 : तळलेले मोदक २ दिवस राहतील कुरकुरीत; पिठात मिसळा हा १ पदार्थ

Fried Modak Tips : तळलेले मोदक मऊ पडू नयेत यासाठी पिठात रवा मिसळण्यापासून ते योग्य आचेवर तळण्यापर्यंतच्या ५ सोप्या टिप्स जाणून घ्या.

Mayuri Gawade

गणपती बाप्पासाठी मोदक करताना उकडीच्या मोदकांसोबत तळणीचे मोदकही अनेक घरांमध्ये आवर्जून केले जातात. बाहेरून खमंग आणि आतून सारणाने भरलेले तळलेले मोदक गरमागरम असताना तर अप्रतिम लागतात; मात्र काही वेळाने त्यांचा कुरकुरीतपणा कमी होऊन ते मऊ पडतात. तुमच्याही मोदकांसोबत असंच होत असेल तर काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. पिठात थोडासा रवा मिसळण्यापासून ते मोदक पूर्ण थंड झाल्यावर साठवण्यापर्यंतच्या या ५ टिप्स उपयोगी ठरतील.

१. पिठात रवा मिसळा

तळलेल्या मोदकाची पारी तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरत असाल, तर त्यात २ ते ३ चमचे बारीक रवा घाला. रव्यामुळे पारीला चांगला कडकपणा येण्यास मदत होते आणि तळल्यानंतर मोदक अधिक कुरकुरीत राहतात.

२. मोहन देताना ही चूक करू नका

पीठ मळण्यापूर्वी त्यात साधारण २ चमचे कडकडीत गरम तेल किंवा साजूक तूप घाला. हे मोहन पिठात हाताने व्यवस्थित चोळून घ्या, जेणेकरून ते सर्वत्र नीट मिसळेल. योग्य प्रमाणात मोहन वापरल्यास पारी खुसखुशीत होण्यास मदत होते.

३. कणिक पुरीच्या पिठासारखी ठेवा

तळलेल्या मोदकांसाठी कणिक खूप मऊ ठेवू नका. पुरीच्या कणकेप्रमाणे थोडी घट्ट कणिक मळा. पीठ जास्त सैल किंवा मऊ असेल तर मोदक तळल्यानंतर नरम होऊ शकतात.

कणिक मळल्यानंतर ती साधारण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही.

४. मोदक तळताना गॅस मध्यमपेक्षा कमी ठेवा

तेल आधी चांगले गरम होऊ द्या आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर आणून मोदक तळा. मोठ्या आचेवर तळल्यास मोदक बाहेरून पटकन रंग घेतील; मात्र आतून नीट शिजण्यापूर्वीच ते काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोदक मंद आचेवर सावकाश सोनेरी रंग येईपर्यंत तळणे योग्य.

५. तळलेले मोदक लगेच डब्यात भरू नका

मोदक तळून झाल्यावर त्यांना लगेच हवाबंद डब्यात ठेवणे टाळा. जाळीवर किंवा अशा ताटात ठेवा, ज्यामुळे त्यांची वाफ बाहेर पडू शकेल. मोदक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते हवाबंद डब्यात भरून ठेवा.

गरम मोदक झाकून ठेवल्यास आत तयार झालेली वाफ ओलावा निर्माण करू शकते. त्यामुळे बाहेरून कुरकुरीत असलेले मोदक काही वेळातच मऊ पडू शकतात.

कुरकुरीत मोदकांसाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा

रवा घाला, योग्य प्रमाणात मोहन द्या, कणिक घट्ट मळा, मंद आचेवर तळा आणि पूर्ण थंड झाल्यावरच साठवा. या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्यास तळणीचे मोदक अधिक खमंग आणि कुरकुरीत ठेवण्यास मदत होईल.

आजचे राशिभविष्य, २० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

आईची साडी, जुन्या आठवणी अन् शिवानी रांगोळेचा मोहक लूक; पाहा खास फोटो

Ganeshotsav 2026 : मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय? बनवा ओल्या नारळाची स्वादिष्ट करंजी, नोट करा सोपी रेसिपी

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार