गणेशोत्सवात रोज बाप्पासाठी नैवेद्याला नवनवीन पदार्थ बनवले जातात. त्यात जर कोकणातील प्रसिद्ध आणि पारंपरिक गोड पदार्थाची सोपी रेसिपी मिळाली, तर काय बोलावं! अशाच एका कोकणातील पारंपरिक पदार्थाची रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सात काप्याचे घावणे. तांदळाच्या पिठापासून बनवला जाणारा हा गोड पदार्थ मऊसर, जाळीदार आणि अतिशय स्वादिष्ट लागतो. सणासुदीला, विशेषतः बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा गोड पदार्थ अगदी योग्य ठरेल.
साहित्य:
तांदळाचे पीठ
मीठ
गूळ
ओलं खोबरं
वेलची पावडर
तूप
कृती:
सात काप्याचे घावणे बनवण्यासाठी सर्वप्रथम सारण तयार करा. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ओलं खोबरं टाकून परतून घ्या. खोबरं किंचित लालसर झाल्यावर त्यात गूळ आणि वेलची पावडर घालून नीट मिक्स करा. सारण तयार झाल्यावर गॅस बंद करा. आता दुसऱ्या भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला आणि थोडंसं पाणी टाकून घट्टसर मिश्रण तयार करा. लोखंडी भिडे किंवा पॅन गरम करून त्याला हलकं तेल लावा आणि त्यावर हे मिश्रण पातळसर पसरवा. लगेच त्यावर खोबऱ्याचे सारण टाका आणि घावण्याची घडी घाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पुन्हा पिठाचा थर पसरवून त्यावर सारण ठेवत अशी घावणी तयार करत राहा. सर्व घावणे तयार झाल्यावर त्यावर थोडंसं ओलं खोबरं पसरवून गरमागरम सर्व्ह करा.
बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही सोपी आणि पारंपरिक कोकणी रेसिपी नक्की करून बघा.