कुरकुरीत कोबी पराठा बनवायचाय? 'या' ५ टिप्स ठेवा लक्षात  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

कुरकुरीत कोबी पराठा बनवायचाय? 'या' ५ टिप्स ठेवा लक्षात

कोबी किसल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सुटते. हे पाणी तसेच ठेवले तर स्टफिंग खूप ओलसर होते आणि...

किशोरी घायवट-उबाळे

नाश्त्यासाठी झटपट आणि पोटभर खाण्यासाठी कोबी पराठा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. गरमागरम कोबी पराठ्यासोबत दही, लोणचे किंवा लोण्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, घरच्या घरी कोबी पराठा बनवताना अनेकदा पराठा लाटताना फाटणे, स्टफिंग बाहेर येणे किंवा पराठा नरम पडणे अशा समस्या येतात. पण काही छोट्या चुका टाळल्या तर कोबी पराठा सहज, कुरकुरीत आणि चविष्ट बनवता येतो.

कोबी बारीक किसणे गरजेचे

कोबी पराठा बनवताना सर्वात आधी कोबी बारीक किसून घ्यावी. कोबीचे तुकडे मोठे राहिल्यास पराठा लाटताना अडचण येते. त्यामुळे पीठ फाटण्याची आणि स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता वाढते. म्हणून कोबी शक्य तितकी बारीक किसून घ्यावी.

कोबीतील अतिरिक्त पाणी काढा

कोबी किसल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सुटते. हे पाणी तसेच ठेवले तर स्टफिंग खूप ओलसर होते आणि पीठ लाटताना हाताळणे कठीण जाते. त्यामुळे किसलेल्या कोबीतील अतिरिक्त पाणी चांगले पिळून काढणे महत्त्वाचे आहे.

मीठ लवकर घालू नका

स्टफिंग तयार करताना अनेकजण सुरुवातीलाच त्यात मीठ घालतात. मात्र, मीठामुळे कोबीतील पाणी बाहेर पडते आणि स्टफिंग पातळ व ओलसर होऊ शकते. त्यामुळे पराठा भरण्याच्या अगदी आधी मीठ घालणे योग्य ठरते.

स्टफिंग थोडे परतून घ्या

कोबीचे स्टफिंग थेट कच्चे वापरण्याऐवजी ते हलके परतून घेतल्यास पराठ्याची चव आणि पोत दोन्ही चांगले होतात. यासाठी किसलेला कोबी जिरे, हिरवी मिरची आणि कांद्यासोबत हलका परतून घ्यावा. कोबीतील अतिरिक्त पाणी पूर्णपणे आटल्यावर त्यात कसुरी मेथी आणि आवडीनुसार मसाले घालावेत.

स्टफिंग जास्त भरू नका

पराठ्यात जास्त स्टफिंग भरल्यास तो लाटताना फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पीठात प्रमाणात स्टफिंग भरावे. स्टफिंग आधी पूर्णपणे थंड होऊ द्यावे आणि त्यानंतर त्यात मीठ घालावे. पीठ व्यवस्थित बंद करून हलक्या हाताने पराठा लाटल्यास तो फाटणार नाही.

कुरकुरीत कोबी पराठ्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

बारीक किसलेला आणि अतिरिक्त पाणी काढलेला कोबी, योग्य वेळी घातलेले मीठ, नीट परतलेले स्टफिंग आणि प्रमाणात भरलेले सारण यामुळे कोबी पराठा बनवणे सोपे होते. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास पराठा लाटताना फाटणार नाही, स्टफिंग बाहेर येणार नाही आणि तयार झालेला पराठाही कुरकुरीत व चविष्ट होईल.

Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

२ हजारांवरील UPI पेमेंटवर MDR; ग्राहकांच्या खिशावर काय होणार परिणाम?

Mumbai : अभियंत्यांच्या ऑनलाइन बदली धोरणाला पाठिंबा; घराजवळच बदली करण्याची अपेक्षा, अभियंता संघटनेचे आयुक्तांना पत्र

खासगी मॉडेल सब-रजिस्ट्रार केंद्रात नोंदणीसाठी शुल्क; मुंबईतील बीकेसी, नवी मुंबई आणि नागपुरात नवीन केंद्रे सुरु

Mumbai : मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीवर सेन्सर्सची नजर; फेज-३ च्या प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रकल्प सल्लागार