सर्व काही नियोजनानुसार झाल्यास भारतातील महामार्गांवरुन प्रवास करणे लवकरच स्वस्त आणि त्रासमुक्त होणार आहे. एरव्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना ठिकठिकाणी येणाऱ्या टोलनाक्यांवर थांबावे लागते. त्यातच सुट्ट्या पैशांवरून अनेकदा वादही उद्भवतात. आता या कटकटीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार वार्षिक आणि लाइफटाइम (आजीवन) पास आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे.
टोल प्लाझावर होणारी वाहनांची गर्दी कमी करणे आणि सध्याच्या टोल पेमेंट प्रणालीला परवडणारा पर्याय उपलब्ध करून देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या प्रस्तावाचे पुनरावलोकन करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. नवीन प्रणाली अंतर्गत, प्रवाशांना दोन पर्याय असतील:
वार्षिक टोल पास: ३ हजार रुपयांचा वार्षिक पास असेल आणि कोणत्याही राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्गांवर अमर्यादित प्रवास करण्याची परवानगी असेल.
आजीवन टोल पास: १५ वर्षांचा आजीवन पास ३० हजार रुपयांचा असेल आणि कोणत्याही राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्गांवर अमर्यादित प्रवास करण्याची परवानगी असेल.
कशी असणार सिस्टिम?
विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या फास्टॅग प्रणालीतच हे पास समाविष्ट केले जातील. म्हणजेच तुम्हाला नवीन कार्ड खरेदी करण्याची गरज भासणार नाही. वार्षिक किंवा आजीवन पास तुमच्या FASTag खात्याशी लिंक केला जाईल. टोल नाका ओलांडल्यास तुमचा टोल टॅक्स आपोआप कापला जाईल. त्यामुळे आणखी कागदपत्रे सादर करण्याची किंवा नवीन यंत्रणा आणण्याची कोणतीच गरज भासणार नाही.
सध्याची यंत्रणा-
सध्या, महामार्ग वापरकर्ते फक्त मासिक टोल पास घेऊ शकतात, ज्याची किंमत प्रति महिना अंदाजे ३४० रुपये किंवा प्रति वर्ष ४,०८० रुपये आहे. तथापि, हे पास केवळ एका टोल प्लाझासाठी वैध असल्याने अन्य टोल प्लाझावर त्याचा उपयोग होत नाही. मात्र वार्षिक आणि आजीवन पासमध्ये ही अट नसेल.
फायदा काय?
नवीन प्रणालीचा मोठा फायदा खासगी वाहन मालकांना, विशेषत: मध्यमवर्गीय प्रवाशांना, जे अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतात, त्यांना होईल असा अंदाज आहे. खासगी मोटारगाड्या सध्या एकूण टोल उत्पन्नामध्ये २६ टक्के देतात आणि टोल बूथवर, विशेषतः गर्दीच्या वेळी, ट्रॅफिक जामचे प्रमुख कारण आहेत. टोल संकलनाची प्रक्रिया सुलभ झाल्याने ट्रॅफिक जाम कमी होईल आणि नियमित महामार्ग वापरकर्त्यांना अमर्यादित प्रवासासह आर्थिक दृष्ट्याही दिलासा मिळेल. देशातील सर्व महत्त्वाच्या महामार्गांवर फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी धीम्या नेटवर्कमुळे टोल आकारण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्या प्रणालीमुळे वाहनचालकांना कोणताही वेळ न घालवता सहजपणे टोलनाका पार करता येईल. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाही लागणार नाहीत.
प्रति किलोमीटर टोल दरही कमी होणार?
याशिवाय, महामार्ग वापरकर्त्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी प्रति किलोमीटर टोल दर बदलण्याचा विचार मंत्रालय करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सरकारने टोल टॅक्सच्या मुद्द्यांवर संशोधन पूर्ण केले आहे आणि लोकांची चिंता दूर करण्यासाठी प्रस्ताव प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
काय आहेत ठळक वैशिष्ट्ये?
- नवा वार्षिक पास ४ हजारांऐवजी ३ हजार रुपये असेल.
- १५ वर्षांसाठी लाइफटाइम पास हा ३० हजार रुपयांचा असेल.
- नवीन पास फास्टॅग प्रणालीशी जोडले जातील. त्यासाठी नवीन उपकरणाची किंवा कागदपत्रांची गरज भासणार नाही.
- वार्षिक किंवा लाइफटाइम पासवर वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर अमर्यादित वेळा प्रवास करता येईल.