Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती  
लाईफस्टाईल

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Hartalika Teej 2026 : यंदा हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत. जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त, उपवास, पारणं आणि पूजेचे साहित्य.

Mayuri Gawade

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव महिलांसाठी खास ठरणार आहे. कारण १४ सप्टेंबर २०२६ रोजी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी साजरी होणार आहे. तिथीच्या गणनेनुसार सूर्योदयाच्या वेळी तृतीया असून मध्यान्हकाळात चतुर्थी येत असल्याने दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे हरितालिकेचा उपवास कधी करायचा, पूजा कोणत्या क्रमाने करायची आणि उपवास कधी सोडायचा, याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊयात सविस्तर...

हरतालिका पूजन कधी करायचं?

पंचांगानुसार १४ सप्टेंबरला सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होईल. मात्र पूजेसाठी तिथीचा सूर्योदयाशी असलेला संबंध महत्त्वाचा असल्याने ब्रह्ममुहूर्तापासून दुपारपर्यंत हरतालिका पूजन करता येईल, अशी माहिती दिली जाते.

दोन्ही सण एकाच दिवशी असल्याने आधी हरतालिका पूजन करून त्यानंतर गणपतीची स्थापना करता येईल. गणेश चतुर्थीच्या स्थापनेसाठी सकाळी ११ ते दुपारी १.४० हा मध्यान्हकाळ शुभ मानला जात आहे.

हरितालिकेचा उपवास कधी सोडायचा?

हरितालिकेचा उपवास १४ सप्टेंबर रोजी दिवसभर करायचा असून, त्याच दिवशी उपवास सोडायचा नाही. १५ सप्टेंबर रोजी सकाळी उत्तरपूजा आणि विसर्जन केल्यानंतर पारणं करण्याचा नियम सांगितला जातो.

१५ सप्टेंबरला ऋषीपंचमीचाही उपवास करणाऱ्या महिलांसाठी वेगळी पद्धत सांगितली जाते. अशा वेळी हरतालिका विसर्जनानंतर प्रतीकात्मक पारणं करून ऋषीपंचमीचा उपवास पुढे सुरू ठेवता येतो.

पूजेसाठी आवश्यक साहित्य

  • मूर्ती: वाळू किंवा काळ्या मातीपासून बनवलेली शिव-पार्वती आणि सखीची मूर्ती

  • मांडणी: चौरंग/पाट, स्वच्छ वस्त्र, तांदूळ

  • सजावट: फुले, आंब्याची पानं, केळीचे खांब, रांगोळी

  • पूजा साहित्य: हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, विड्याची पानं, सुपारी, नारळ

  • नैवेद्य: फळं, गूळ-खोबरे आणि गोड पदार्थ

  • इतर साहित्य: कापूर, अगरबत्ती, निरंजन, शुद्ध पाणी आणि पंचामृत

  • सौभाग्यवस्तू: बांगड्या, काजळ, आरसा, कंगवा, मंगळसूत्र, बिंदी

  • विशेष पत्री: विविध प्रकारची पत्री, बेलाची पानं आणि पांढरी फुलं

हरतालिका पूजेची पद्धत

चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून तांदूळ ठेवावेत. त्यावर शिव-पार्वती आणि सखीची स्थापना करावी. पंचामृत व पाण्याने अभिषेक करून वस्त्र आणि सौभाग्य अलंकार अर्पण करावेत. त्यानंतर बेलपत्र आणि पूजेतील पत्री अर्पण करून नैवेद्य, आरती आणि हरतालिका व्रतकथा करावी.

हरतालिका पूजेत विविध वनस्पतींच्या पत्रीलाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पूजेच्या निमित्ताने या स्थानिक वनस्पतींची ओळख, जपणूक आणि संवर्धन करण्याचा संदेशही दिला जातो.

(ही माहिती सर्वसाधारण धार्मिक परंपरा आणि उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे.)

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video