Healthy Snack : ओट्स आणि मूगडाळीचे स्वादिष्ट दहीवडे; घरच्या घरी बनवा झटपट रेसिपी  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Healthy Snack : ओट्स आणि मूगडाळीचे स्वादिष्ट दहीवडे; घरच्या घरी बनवा झटपट रेसिपी

कमी तेलात तयार होणारा हा पौष्टिक पदार्थ नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक किंवा सणावाराच्या मेनूमध्येही सहज समाविष्ट करता येतो.

किशोरी घायवट-उबाळे

दहीवडे म्हटले की तळणीमुळे अनेक जण ते खाणे टाळतात. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. ओट्स आणि मूगडाळीपासून बनवलेले हेल्दी दहीवडे हे चवीला तितकेच स्वादिष्ट असून तेलकट नसल्याने आरोग्यासाठीही उत्तम पर्याय आहेत. विशेष म्हणजे हे वडे डीप फ्राय न करता अप्पेपात्रात तयार केले जातात. त्यामुळे कमी तेलात तयार होणारा हा पौष्टिक पदार्थ नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक किंवा सणावाराच्या मेनूमध्येही सहज समाविष्ट करता येतो.

साहित्य :

वड्यांसाठी -

  • १ कप पिवळी मूगडाळ

  • अर्धा कप रोल्ड ओट्स

  • १ लहान कांदा (बारीक चिरलेला)

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • अर्धा इंच आले (किसलेले)

  • चिमूटभर हिंग

  • अर्धा टीस्पून जिरे

  • चवीनुसार मीठ

  • अप्पेपात्राला लावण्यासाठी थोडे तेल

सजावटीसाठी

  • २ कप फेटलेले दही

  • चिंचेची गोड-तिखट चटणी

  • भाजलेल्या जिऱ्याची पूड

  • लाल तिखट

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

सर्वप्रथम मूगडाळ ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून टाका. भिजवलेली मूगडाळ आणि रोल्ड ओट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून गुळगुळीत मिश्रण तयार करा.

त्यात कांदा, हिरवी मिरची, आले, हिंग, जिरे आणि मीठ घालून नीट एकजीव करा. अप्पेपात्राला हलके तेल लावून त्यात तयार मिश्रण चमच्याने घाला. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत वडे शिजवून घ्या.

एका भांड्यात दही फेटून त्यात चिमूटभर मीठ घाला. तयार वडे कोमट पाण्यात २ ते ३ मिनिटे भिजवा आणि हलक्या हाताने अतिरिक्त पाणी काढून टाका. सर्व्हिंग प्लेटमध्ये वडे ठेवून त्यावर भरपूर दही घाला.

त्यावर चिंचेची चटणी, भाजलेल्या जिऱ्याची पूड, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून सजवा. हेल्दी आणि चविष्ट ओट्स-मूगडाळ दहीवडे सर्व्ह करा.

टिप्स :

  • मूगडाळ किमान ३ ते ४ तास भिजवल्यास वडे मऊ होतात.

  • मिश्रण फार पातळ करू नका, अन्यथा वडे व्यवस्थित तयार होणार नाहीत.

  • अप्पेपात्रात शिजवल्यामुळे कमी तेलातही वडे छान तयार होतात.

  • दही थंडगार आणि चांगले फेटलेले वापरल्यास चव अधिक खुलते.

  • चिंचेच्या चटणीसोबत हिरवी चटणी घातल्यास दहीवड्यांची चव आणखी वाढते.

  • सर्व्ह करण्यापूर्वीच मसाले आणि कोथिंबीर घाला, त्यामुळे दहीवडे ताजे आणि आकर्षक दिसतात.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती