नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ

ओट्स, रवा, दही आणि मिश्र भाज्यांपासून तयार होणारा हा मऊ, स्पंजी ढोकळा चवदार तर आहेच, शिवाय पौष्टिकही आहे.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक बनवायचे असेल, तर ओट्स आणि व्हेजिटेबल ढोकळा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ओट्स, रवा, दही आणि मिश्र भाज्यांपासून तयार होणारा हा मऊ, स्पंजी ढोकळा चवदार तर आहेच, शिवाय पौष्टिकही आहे. अवघ्या २० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

साहित्य :

  • १/२ कप ओट्सची पावडर

  • १/२ कप दही

  • १/२ कप रवा

  • १/२ टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट

  • १/२ कप उकडलेल्या मिश्र भाज्या (मटार, फ्रेंच बीन्स, गाजर)

  • चवीनुसार मीठ

  • १ टेबलस्पून इनो फ्रूट सॉल्ट

  • सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

  • लाल तिखट (सजावटीसाठी)

  • ताटाला लावण्यासाठी थोडे तेल

कृती :

एका भांड्यात ओट्सची पावडर, रवा, दही, आले-मिरची पेस्ट, उकडलेल्या भाज्या आणि मीठ घालून चांगले एकजीव करा. शेवटी इनो फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हाताने मिसळा. मिश्रण फेसाळू लागल्यावर लगेच पुढील प्रक्रिया करा. एका ताटाला किंवा ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करा. तयार मिश्रण ताटात ओता आणि हलकेच हलवून समान पसरवा. वरून चिरलेली कोथिंबीर आणि थोडे लाल तिखट भुरभुरा.

स्टीमरमध्ये ८ ते ९ मिनिटे वाफेवर शिजवा. ढोकळा पूर्णपणे शिजल्याची खात्री करून बाहेर काढा. थोडा गार झाल्यावर चौकोनी तुकडे करा आणि हिरव्या कोथिंबिरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • ओट्स आधी मिक्सरमध्ये बारीक करूनच वापरा.

  • इनो घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ ठेवू नका; लगेच वाफवण्यासाठी ठेवा.

  • आवडीनुसार ढोकळ्यात ढोबळी मिरची, मक्याचे दाणे किंवा पालकही घालू शकता.

  • ढोकळा अधिक मऊ आणि स्पंजी होण्यासाठी मिश्रण हलक्या हातानेच मिसळा.

  • हिरव्या चटणीसोबत किंवा गोड-तिखट चिंचेच्या चटणीसोबत हा ढोकळा अधिक स्वादिष्ट लागतो.

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

'ती' घरे अधिकृत करणार, उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची घोषणा; जमिनी फ्री होल्ड आणि समूह विकास योजनेतून गती मिळणार