लाईफस्टाईल

'मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार'; २४०० रुपयांत ‘ऑपरेशन सिंदूर’ घड्याळ, HMT वर नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

देशातील प्रतिष्ठित घड्याळ ब्रँड HMT Watches ने नुकतंच ‘Operation Sindoor JGSL 01’ नावाचं नवं घड्याळ सादर केलं असून, घड्याळाच्या नावामुळे आणि डिझाइनमुळे सोशल मीडियावर अनेक नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत. नेटकऱ्यांनी या घड्याळावर जोरदार टीका करत, “लोकांच्या मृत्यूवर व्यवसाय करण्याचा हा प्रयत्न आहे” असा आरोप केला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : देशातील प्रतिष्ठित घड्याळ ब्रँड HMT Watches ने नुकतंच ‘Operation Sindoor JGSL 01’ नावाचं नवं घड्याळ सादर केलं असून, घड्याळाच्या नावामुळे आणि डिझाइनमुळे सोशल मीडियावर अनेक नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत. नेटकऱ्यांनी या घड्याळावर जोरदार टीका करत, “लोकांच्या मृत्यूवर व्यवसाय करण्याचा हा प्रयत्न आहे” असा आरोप केला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे घड्याळ रोजच्या वापरासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये स्टील रंगाची ब्रास बॉडी, साधा पांढरा डायल आणि काळा लेदर स्ट्रॅप देण्यात आला आहे. हे घड्याळ पांढरा आणि लाल अशा दोन डायल रंगांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, या घड्याळाच्या डिझाइनवरून टीकेचा भडीमार होतोय. घड्याळाच्या काट्यांच्या मध्यभागी जणूकाही एका वाटीत सिंदूर ठेवल्याचे दिसते तर उजव्या बाजूला तोच लाल रंग पसरलेला दिसतो. हाच वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे डिझाइन ‘ऑपरेशन सिंदूर’मागील भावना प्रतिबिंबित करतो.

नेटकऱ्यांचा संताप - मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार

घड्याळ सादर होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
“यात साजरं करण्यासारखं काय आहे? या घटनेत लोकांचे प्राण गेलेत.” असे एका वापरकर्त्याने लिहिले. तर दुसऱ्याने थेट शब्दांत टीका करत म्हटलं, “या वर्षातील सगळ्यात भयानक घड्याळ डिझाइनचा पुरस्कार यालाच द्यावा लागेल.” काहींनी या घड्याळाला आदरांजलीपेक्षा प्रचारकी उत्पादन असल्याचं म्हटलं. अनेकांनी हा मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका केली. “युद्धावर घड्याळ बनवणं अनावश्यक आणि असंवेदनशील आहे. हा सन्मान नाही, तर प्रचार वाटतो,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर आणखी एका युजरने संतप्त होत लिहिलं, “इतक्या मोठ्या ब्रँडकडून हे अपेक्षित नव्हतं. दुर्दैवी घटनेतून नफा कमावणं लाजिरवाणं आहे.” कलेक्टर्स आणि डिझाइन फोरम्सवरही या घड्याळावर टीका झाली असून, डिझाइन ‘स्वस्त, दिखाऊ आणि विचारशून्य’ असल्याचं म्हटलं जात आहे. काहींच्या मते, HMT ला जर आदरांजलीच द्यायची होती, तर ती अधिक सूचक आणि सौम्य पद्धतीने देता आली असती.

‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागचं संवेदनशील वास्तव

या वादामागचं मूळ कारण समजून घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाचं महत्त्व जाणून घेणं आवश्यक आहे. एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने मे महिन्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी महत्त्वाचं असलेलं ‘सिंदूर’ या घटनेत दुःख, शोक आणि गमावलेल्या जीवांचं प्रतीक म्हणून वापरण्यात आलं. भारतीय लष्कराच्या अधिकृत ‘ऑपरेशन सिंदूर’ लोगोमध्येही हा सिंदूर घटक श्रद्धांजली म्हणून समाविष्ट करण्यात आला होता.

व्यवसाय आणि संवेदनशीलतेमधली नाजूक रेषा

या वादामुळे- राष्ट्रीय शोकांतिका आणि लष्करी कारवायांशी निगडित भावनिक विषयांचा वापर व्यावसायिक उत्पादनांसाठी करणं योग्य आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेकांचे मत आहे की अशा संवेदनशील घटनांवर आधारित वस्तू विक्रीसाठी आणल्यास, पीडितांच्या दुःखापेक्षा नफ्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र निर्माण होतं.

दरम्यान, HMT कडून अद्याप या वादावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी सोशल मीडियावरील संताप पाहता हा वाद लवकर शांत होण्याची शक्यता कमी आहे.

BMC Budget 2026 : श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष

ठाकरे सेना, पवार गट की कॉंग्रेस? राज्यसभेच्या एका जागेवरून आघाडीत बिघाडीची शक्यता

तपासात सहकार्य करत नसल्याने शीतल तेजवानीला अटक; राज्य सरकारचा दावा; मुंढवाप्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

२४ महिन्यांत संपादन न केल्यास, जमिनीचे आरक्षण आपोआप रद्द; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा

Mumbai : स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची उद्या घोषणा; भाजपची ४, शिंदे सेनेची २, तर ठाकरे सेनेची ३ नावे जाहीर