होळी म्हणजे रंगांचा जल्लोष. पण सण संपल्यानंतर खरी परीक्षा सुरू होते ती त्वचेवरील हट्टी रंग काढण्याची. आजकाल ऑर्गेनिक गुलाल उपलब्ध असला तरी अनेक ठिकाणी वापरले जाणारे रंग रसायनयुक्त असतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज, पुरळ, चट्टे किंवा टाळूला त्रास होऊ शकतो. म्हणूनच होळीनंतर योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, रंग काढताना जोरजोरात घासणे किंवा साबण वापरणे टाळावे. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि संवेदनशीलता वाढू शकते. होळीनंतरची काळजी म्हणजे फक्त रंग काढणे नव्हे, तर त्वचेचा ओलावा परत मिळवणे आणि दाह कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आंघोळीपूर्वी चेहरा आणि शरीरावर खोबरेल, बदाम किंवा ऑलिव्ह तेल लावून १५ ते २० मिनिटे ठेवावे. तेलामुळे रंग सहज निघतात. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने आणि माइल्ड फेसवॉशने स्वच्छ धुवावा. रंग चिकटून बसला असेल तर बेसन आणि दूध किंवा दह्याचा हलका लेप उपयोगी ठरतो.
त्वचा स्वच्छ केल्यानंतर अॅलोव्हेरा जेल किंवा हायल्युरोनिक अॅसिड असलेली क्रीम लावल्यास लालसरपणा कमी होतो. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी, नारळपाणी किंवा फळांचा रस पिणे फायदेशीर ठरते. सूर्यप्रकाशात त्वचा खराब होऊ नये म्हणून बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. योग्य काळजी घेतल्यास होळीचा आनंद टिकवून ठेवत त्वचेचे दीर्घकालीन नुकसान टाळता येऊ शकते.