महागड्या शाम्पूला पर्याय शोधताय? आवळा, रिठा आणि शिकेकाईपासून घरच्या घरी बनवा हर्बल शाम्पू 
लाईफस्टाईल

महागड्या शाम्पूला पर्याय शोधताय? आवळा, रिठा आणि शिकेकाईपासून घरच्या घरी बनवा हर्बल शाम्पू

आवळा, रिठा आणि शिकेकाईपासून घरच्या घरी हर्बल शाम्पू बनवा. जाणून घ्या शाम्पू तयार करण्याची सोपी कृती, वापरण्याची पद्धत आणि आवश्यक काळजी.

Mayuri Gawade

महागडे शाम्पू वापरूनही केसांचा कोरडेपणा किंवा गुंतण्याचा त्रास जाणवत असेल, तर केसांच्या स्वच्छतेसाठी पारंपरिक घटकांचा पर्याय वापरून पाहता येतो. आवळा, रिठा आणि शिकेकाई हे घटक अनेक वर्षांपासून केसांच्या निगेसाठी वापरले जातात. या घटकांपासून घरच्या घरी हर्बल शाम्पू तयार करता येतो. यासाठी फारसं साहित्य लागत नाही. मात्र, नैसर्गिक घटकांपासून बनवलेला शाम्पू प्रत्येकाच्या केसांना सारखाच उपयोगी पडेल असे नाही. त्यामुळे तो तयार करताना आणि वापरताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

हर्बल शाम्पू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • रिठ्याचे ५ ते ६ तुकडे (बिया काढलेले)

  • ४ ते ५ शिकेकाईचे तुकडे

  • १ चमचा आवळा पावडर

  • ३ कप पाणी

घरगुती हर्बल शाम्पू बनवण्याची कृती

१. साहित्य भिजत ठेवा : एका भांड्यात रिठा, शिकेकाई, आवळा पावडर आणि पाणी एकत्र करून रात्रभर भिजत ठेवा. यामुळे हे घटक मऊ होण्यास मदत होते.

२. मिश्रण उकळून घ्या : दुसऱ्या दिवशी हे मिश्रण मंद आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे उकळा. पाण्याचे प्रमाण कमी होऊन मिश्रणातील घटक मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा.

३. मिश्रण थंड करून गाळा : मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर रिठा आणि शिकेकाईचे तुकडे हाताने किंवा चमच्याने कुस्करून घ्या. हे मिश्रण गाळून त्यातील द्रव वेगळा करा. अशा प्रकारे घरगुती हर्बल शाम्पू तयार होईल.

हर्बल शाम्पू वापरण्याची योग्य पद्धत

केस धुताना तयार केलेले मिश्रण थोडे थोडे टाळूवर लावा. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर पाण्याने केस व्यवस्थित स्वच्छ धुवा. या शाम्पूला बाजारात मिळणाऱ्या शाम्पूप्रमाणे भरपूर फेस येईलच असे नाही. त्यामुळे फेस कमी आला म्हणून पुन्हा पुन्हा शाम्पू लावण्याची गरज नाही.

केस कोरडे किंवा गुंतणारे असतील, तर केसांच्या लांबीनुसार कंडिशनर वापरता येईल. सुरुवातीला केसांचा पोत वेगळा जाणवू शकतो. त्यामुळे केसांच्या गरजेनुसार वापरात बदल करणे योग्य ठरेल.

हर्बल शाम्पू वापरताना कोणती काळजी घ्यावी?

  • ताजा शाम्पू तयार करा : या मिश्रणात टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे घटक नसल्यामुळे ते जास्त काळ साठवून ठेवू नका. शक्यतो एक-दोन वेळांच्या वापरापुरतेच मिश्रण तयार करा.

  • त्वचेची संवेदनशीलता तपासा : रिठा आणि शिकेकाईमुळे काही व्यक्तींना त्वचेची जळजळ किंवा कोरडेपणा जाणवू शकतो. पहिल्यांदा वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करा.

  • डोळ्यांची काळजी घ्या : मिश्रण डोळ्यांत जाणार नाही याची खबरदारी घ्या. डोळ्यांत गेल्यास स्वच्छ पाण्याने धुवा.

  • केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका : केस गळणे, सतत खाज येणे किंवा कोंडा होणे यांसारख्या समस्या कायम असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवा, आवळा, रिठा आणि शिकेकाई हे पारंपरिक केस निगेचे घटक असले, तरी या मिश्रणामुळे केसगळती थांबते किंवा केसांची वाढ वाढते, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. केस आणि टाळूच्या स्थितीनुसार त्याचा परिणाम वेगवेगळा असू शकतो.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान