Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या खास मेजवानीसाठी करा तिरंगा बर्फी; दिसायला सुंदर, बनवायलाही सोपी  'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या खास मेजवानीसाठी करा तिरंगा बर्फी; दिसायला सुंदर, बनवायलाही सोपी

स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवण्यासाठी यंदा घरीच बनवा आकर्षक तिरंगा बर्फी. मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि मोजक्याच साहित्यापासून केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या थरांची बर्फी कशी बनवायची, जाणून घ्या सोपी रेसिपी.

Mayuri Gawade

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस. या दिवशी घरात तिरंग्याची सजावट, देशभक्तीपर गाणी आणि खास पदार्थांची मेजवानी केली जाते. यंदा स्वातंत्र्यदिनाचा गोडवा आणखी खास करायचा असेल, तर नेहमीच्या मिठाईऐवजी घरच्या घरी तिरंगा बर्फी करून पाहा.

केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या थरांमुळे ही बर्फी दिसायला अगदी आकर्षक लागते. विशेष म्हणजे ती बनवण्यासाठी फार मोठी तयारी करण्याची गरज नाही. मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि काही मोजक्याच साहित्यापासून ही बर्फी सहज तयार करता येते.

तिरंगा बर्फीसाठी साहित्य

  • मिल्क पावडर – २ कप

  • कंडेन्स्ड मिल्क – १ कप

  • साजूक तूप – २ टेबलस्पून

  • दूध – ४ ते ५ टेबलस्पून

  • वेलची पूड – अर्धा चमचा

  • केशरी फूड कलर – चिमूटभर

  • हिरवा फूड कलर – चिमूटभर

  • काजू-बदाम – २ टेबलस्पून

  • पिस्त्याचे काप – सजावटीसाठी

तिरंगा बर्फी कशी बनवायची?

सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क घाला. त्यात थोडे दूध टाकून मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडांपासून सुटू लागले की गॅस बंद करा. त्यात वेलची पूड मिसळा.

आता तयार मिश्रणाचे तीन समान भाग करा. एका भागात थोडासा केशरी रंग आणि दुसऱ्या भागात हिरवा रंग मिसळा. तिसरा भाग पांढराच ठेवा. फूड कलरचे प्रमाण जास्त ठेवू नका.

एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हलका हात लावा. सर्वात आधी केशरी मिश्रणाचा थर पसरवा आणि तो समान जाडीचा करा. त्यावर पांढऱ्या मिश्रणाचा थर द्या. त्यानंतर सर्वात वर हिरव्या मिश्रणाचा थर पसरवून हलक्या हाताने सपाट करा.

वरून काजू-बदाम किंवा पिस्त्याचे काप घालून बर्फी सजवा. मिश्रण थंड झाल्यानंतर काही वेळ फ्रिजमध्ये सेट होऊ द्या. बर्फी व्यवस्थित सेट झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे कापा.

अशा प्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनसाठी सुंदर आणि आकर्षक तिरंगा बर्फी तयार होईल.

बर्फी छान होण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

मिश्रण शिजवताना गॅस मंद ठेवा. जास्त वेळ शिजवल्यास बर्फी कडक होऊ शकते. तीनही थर समान जाडीचे ठेवल्यास बर्फी अधिक सुंदर दिसते. तसेच बर्फी पूर्णपणे सेट झाल्यानंतरच तुकडे केल्यास त्यांचा आकार व्यवस्थित राहतो.

Makeup Tips : ब्लश पॅलेट खरेदी करताय? तुमच्या स्किनटोननुसार 'अशी' निवडा योग्य शेड

चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक

Mumbai : २३८ एसी लोकल ४ वर्षे आधीच मिळणार; तीन कारखान्यांत एकाच वेळी उत्पादन; नवी लोकल पुढील वर्षी होणार दाखल

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा