Photo : Instagram (Anisha Sharma)
लाईफस्टाईल

आजची दुर्गा : संकटांवर मात करीत घेतली भरारी; बालगृहातील मुलांना दिला मदतीचा हात

बालपणी आई-वडिलांना गमावून नातेवाईकांच्या आधाराशिवाय वाढलेल्या अनिषा शर्माला बालगृहात राहावे लागले. अनेक संकटांना तोंड देत भावाच्या अकाली मृत्यूनंतरही तिने हार मानली नाही आणि आता बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांना मदत करणाऱ्या संस्थेची ‘सीईओ’ म्हणून कार्यरत आहे.

Swapnil S

आजची दुर्गा : अनिषा शर्मा

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

सुखी चौकोनी कुटुंबात वाढलेल्या अनिषा शर्माला बालपणीच अचानक अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ती ६-७ वर्षाची असताना एकापाठोपाठ एक आई अन‌् नंतर वडिलांचे छत्र हरपले. ती व तिच्या लहान भावाची जबाबदारी घेण्याची तयारी नातेवाईकांनी दाखवली नाही. त्यामुळे त्यांना बालगृहात ठेवण्यात आले. बालगृहातून बाहेर पडल्यानंतर तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यातच अचानक तिच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. अशी अनेक संकटे झेलल्यानंतर अनिषा बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांना मदत करणाऱ्या संस्थेसाठी काम करू लागली. आज ती या संस्थेची ‘सीईओ’ म्हणून कार्यरत आहे.

अनिषा, तिचा लहान भाऊ, वडील आणि आई असे चौघांचे अतिशय सुखी कुटुंब होते. घरची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. अनिषा ५-६ वर्षांची असताना आईसारखी आजारी असायची, तिच्या दवाखान्याच्या खर्च दिवसेंदिवस वाढत होता. वडील सारखे आईच्या आजारपणात दवाखान्यात असायचे. त्यादरम्यान कधी दोन्ही भावंडे आजीकडे तर कधी नानीकडे (वडिलांची आई) असायची. याकाळात दोघांच्या शाळाही सुटल्या होत्या. बऱ्याचदा वडील आईच्या सेवेत असल्यावर दोघांकडे लक्ष द्यायला कुणी नसायचे. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था घरात केलेली नसायची.

‘जयपूर’ची अनिषा शर्मा आपला हा संघर्षमय प्रवास सांगताना काहीशी हळवी झाली. अनिषाची आई एकदिवस आजारपणातच वारली. वडिलांनी याचा खूप धसका घेतला. तेही मग आजारी पडायला लागले. कसंबसं सांभाळत त्यांनी काही दिवस काढले. पण त्यांनाही एकदा दवाखान्यात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनिषाला त्यावेळी काही कळतही नव्हते. तिचा भाऊ तर तिच्यापेक्षा लहान होता. नातेवाईकांनी त्यांची जबाबदारी घेतली नाही. आजीला या दोघांना सांभाळणे कठीण होते. शेवटी त्यांना दिल्लीच्या एका बालगृहात दाखल करण्यात आले. भावाला वेगळ्या संस्थेत दाखल केले गेले.

अनिषा ७-८ वर्षांची असताना बालगृहात गेल्यानंतर तिचे शालेय शिक्षण सुरू झाले. जवळपास १२ वर्षे अनिषा बालगृहात राहिली. अनिषा सांगते, बालगृहामध्ये असताना स्वावलंबी जगण्यासाठी वेगळी अशी शिकवण मिळत नव्हती. बाकी सर्व सुविधा मिळत होत्या, पण स्वतंत्रपणे आम्ही काही विचार करावा, असे काही शिकवले जात नव्हते. मुलांना बाहेर जाऊन बाजारहाट करायला किंवा प्रवासाला परवानगी होती, पण मुलींना नव्हती. त्यामुळे मुलींना स्वावलंबी होणे अधिक कठीण होते. शिक्षण व आर्थिक मदत मिळाली, मात्र १८ वर्षानंतर स्वतंत्र जीवन जगण्याची मानसिक तयारी नव्हती. संस्थेतून बाहेर पडल्यावर काय करायचे, कसे जगायचे ही साधी चर्चा तिथे होत नव्हती. १८ वर्षे पूर्ण होताच तिला बालगृह सोडावे लागले. पण १८ व्या वर्षी जेव्हा तिने बालगृह सोडले, तेव्हा तिला प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागले. पहिल्याच दिवशी माझ्याकडे ना घर होते, ना कुठे जायचे ठिकाण, ना पैसे. मी माझे सामान घेऊन खोली शोधायला निघाले. संपूर्ण दिल्ली फिरूनही कोणी मला एकटीला खोली भाड्याने देत नव्हते. कारण मी एकटी मुलगी होते आणि माझ्याकडे तशी कोणती कागदपत्रेही नव्हती. योगायोगाने माझी आधीची काळजी घेणारी व्यक्ती भेटली, जी माझ्या बालगृहाची मैत्रीण होती आणि तिच्या हमीमुळे मला भाड्याने खोली मिळाली. नोकरी करत मी माझे पदवी शिक्षण पूर्ण केले. माझा भाऊही बालगृह सोडून बाहेर पडला होता. त्याचाच मला आधार होता. तो आणि मी असे मग एकत्रित राहू लागलो. माझे त्यावेळचे एकमेव ध्येय हे स्वत:ला व भावाला आपल्या पायावर उभे करणे हे होते. पण काही वर्षातच माझा भाऊ एका अपघातात वारला. त्याच्या जाण्याने मी खूप खचले होते. भावासाठी खूप काही स्वप्ने मी पाहिली होती.

याचदरम्यान राष्ट्रीय पातळीवरची ‘लिफ्ट फेलोशिप’ मला मिळाली. ज्यातून मला माझ्यासारख्या मुला-मुलींच्या प्रश्नांवर अभ्यास करायची संधी मिळाली. त्यातूनच जयपूरच्या बालगृहातून बाहेर पडलेला आमचा सहकारी मित्र गिरीश मेहता याच्याशी ओळख झाली. त्याने जयपूरमध्ये ‘क्लिक’ नावाची संस्था १८ वर्षावरील बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांचे नेटवर्क तयार करण्यासाठी काढली होती. त्याने मला त्यांच्या नेटवर्कशी ओळख करून दिली आणि मलाही ठोस काम करण्याची संधी मिळाली. आज अनिषा या संस्थेची ‘सीईओ’ आहे आणि पूर्ण राज्यस्थानमधील बालगृहातील मुलांच्याबाबतीत ही संस्था ‘ॲडव्होकसी’ करते.

बालगृहातील मुलांच्या मदतीसाठी तयार केले 'नेटवर्क'

बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांना शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देणे, त्यांचा शैक्षणिक भार उचलणे, त्यांना सुरक्षित निवारा मिळवून देणे, असे काम 'क्लिक' ही संस्था करते. ही संस्था राज्यस्थानमधील अनेक बालगृहांशी जोडलेली असल्याने एक उत्तम नेटवर्क तयार करण्यात अनिषा आणि गिरीश यशस्वी झालेत. त्यातून बऱ्याच मुलांना बालगृहातून बाहेर पडल्यावर येणाऱ्या अडचणी आता कमी जाणवू लागल्या आहेत. हा या मुलांसाठी एक आश्वासक व सकारात्मक बदल आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत