मुंबई : रेल्वेचं तत्काळ (Tatkal) तिकीट बुक करताना वेबसाइट स्लो होणे, कॅप्चा, सतत दिसणारे पॉप-अप आणि काही सेकंदांच्या उशिरामुळे कन्फर्म तिकीट हुकणे, हा अनेक प्रवाशांचा नेहमीचाच अनुभव आहे. मात्र, आयआरसीटीसीने (IRCTC) आपल्या नव्या Beta वेबसाइटमुळे तत्काळ तिकीट बुकिंग अधिक जलद झाल्याचा दावा केला आहे. नव्या आकडेवारीनुसार, वेबसाइट सुरू झाल्यानंतर पहिल्याच काही मिनिटांत होणाऱ्या बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पहिल्या ३ मिनिटांत ५% अधिक बुकिंग
आयआरसीटीसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, बीटा वेबसाइट सुरू झाल्यानंतर तत्काळ बुकिंगच्या पहिल्या तीन मिनिटांत पूर्ण होणाऱ्या बुकिंगमध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय, पहिल्या पाच मिनिटांत होणाऱ्या बुकिंगमध्ये ३ टक्के, तर पहिल्या ३० मिनिटांतील बुकिंगमध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंगचा नवा विक्रम
जुलै २०२६ मध्ये एकूण रेल्वे तिकिटांपैकी तब्बल ८९.८४ टक्के तिकिटे ऑनलाइन बुक करण्यात आल्याची माहितीही आयआरसीटीसीने दिली आहे. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांचा डिजिटल पर्यायांकडे वाढता कल असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
कोणते बदल झाले?
आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, बीटा वेबसाइटमध्ये प्रवाशांचा अनुभव अधिक सोपा आणि जलद करण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून, वारंवार येणारे CAPTCHA कमी करण्यात आले आहेत. तसेच अनावश्यक पॉप-अप हटवण्यात आले असून, एका स्क्रीनवरच विविध प्रवर्गांतील (Classes) सीट उपलब्धता पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सूचनांनुसार होणार आणखी सुधारणा
१५ जुलैपासून सुरू करण्यात आलेली ही बीटा वेबसाइट अद्याप सुधारणा प्रक्रियेत आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायाच्या आधारे वेबसाइटमध्ये आणखी बदल करण्यात येणार असल्याचे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि विश्वासार्ह करण्यासाठी सातत्याने सुधारणा सुरू राहतील, असेही आयआरसीटीसीने म्हटले आहे.