तुमच्या त्वचेला सातत्याने खाज सुटते का? तुम्हाला वारंवार त्वचेचे आजार होत आहेत का? वारंवार त्वचेचे आजार होत असल्यास तुम्हाला हे वाचायलाच हवे. त्वचेला सातत्याने खाज येण्यामागे तुम्ही घालत असलेले कपडे याचे कारण असू शकतात. इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो. कपडे हे त्वचेच्या आजारांमागे कारण कसे असू शकते. मात्र, कपड्यांमुळे अनेक वेळा त्वचेचे विकार होऊ शकतात.
सध्याच्या काळात अनेक कपडे हे अनेक वेगवेगळ्या घटकांपासून बनवले जात आहेत. पूर्वी जास्त करून सुती, वूलन किंवा रेशमाचे कपडे असायचे. मात्र, हल्ली अनेक प्रकारच्या वनस्पतींच्या धाग्यांपासून किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांपासून कपडे तयार केले जातात. कापड तयार होताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल प्रक्रिया केलेल्या असतात. विशेष करून रंगीत कपड्यांच्या बाबतीत हे प्रमाण मोठे आहे. आपण मार्केटमधून कपडे खरेदी करतो. नवीन कपडे आहेत म्हणून अनेक वेळा ते न धुताच वापरतो. अशा प्रकारे नवीन कपडे मार्केटमधून आणल्यानंतर न धुताच घातल्यामुळे त्वचेला याचा संसर्ग जडू शकतो. परिणामी वारंवार खाज येण्यासारखे प्रकार घडतात.
कपडे अनेकदा ट्राय केलेले असल्याने देखील संसर्ग
आताचा काळ हा रेडिमेड कपड्यांचा आहे. तुम्ही शॉप्समध्ये जाता तेव्हा कपडे ट्राय करता. तसेच ऑनलाइन ऑर्डर केलेल्या कपडेदेखील ट्राय करता. मात्र, हे कपडे तुमच्यापूर्वी अनेकांनी ट्राय केलेले असतात. परिणामी त्या व्यक्तिंना जर त्वचेचा एखादा आजार असेल किंवा संसर्ग असेल तर असे कपडे ट्राय केल्याने आणि ते विकत घेऊन न धुता घातल्याने अनेक वेळा त्वचेचे आजार संभवतात.
याशिवाय अनेक वेळा वेगवेगल्या थिम पार्टीजमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे त्या प्रकारचे कपडे नसतील तर असे कपडे भाड्याने घेण्याचा हल्ली ट्रेंड आहे. विशेष करून उत्सव काळात देखील आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कपडे नसतील तर ते भाड्याने घेतले जातात. उदाहणार्थ नवरात्रीत आपल्याकडे गरबा-दांडियासाठी विशिष्ट प्रकारचे घागरे नसतात. अशा वेळी कपडे तात्पुरते भाड्याने घेतले जातात. मात्र, अनेक वेळा हे कपडे पूर्णपणे निर्जंतुक केलेले नसतात. याचा देखील परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो.
घट्ट कपडे घालणे
फॅशन आणि ट्रेंड आहे म्हणून अनेक वेळा आपण खूप जास्त घट्ट कपडे घालतो. यामध्ये स्कीन टाइट जिन्स, घट्ट लेगिन्स अशा प्रकारच्या कपड्यांचा समावेश येतो. हे कपडे आपल्याला वरवर आरामदायक आणि सोयीस्कर वाटत असले तरी यामुळे शरीराला जास्त घाम सुटतो. परिणामी अंगाला खाज येणे, अंग लाल होणे किंवा वळ्या पडणे असे त्वचा विकार संभवतात.
काय आहेत उपाय?
शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही कपडे ट्राय केले असतील तर घरी आल्यानंतर ताबडतोब आंघोळ करून घेणे. यामुळे संसर्ग पसरणार नाही.
नवीन कपडे कायम धुवून कडक उन्हात वाळवून मगच घालणे उत्तम असते. कारण ऊनामुळे कपड्यांचे निर्जंतुकीकरण होते. त्यामुळे त्वचा चांगली राहते.
शक्यतो स्वतःसाठी कपडे शिवून घेतलेले कधीही उत्तम असतात. कारण हे कपडे कोणी ट्राय केलेले नसतात.