लाईफस्टाईल

कडाकणी : दसऱ्याच्या नैवेद्याची खासियत; पश्चिम महाराष्ट्रातील खास पारंपारिक पदार्थ

नवरात्रीचा उत्सव म्हणजे देवीची पूजा, घराघरातील घट आणि नैवेद्याचे वैभव! या नैवेद्यात पश्चिम महाराष्ट्रात एक खास पदार्थ नेहमी पाहायला मिळतो तो म्हणजे 'कडाकणी'.

नेहा जाधव - तांबे

नवरात्रीचा उत्सव म्हणजे देवीची पूजा, घराघरातील घट आणि नैवेद्याचे वैभव! या नैवेद्यात पश्चिम महाराष्ट्रात एक खास पदार्थ नेहमी पाहायला मिळतो तो म्हणजे 'कडाकणी'. नावातच दडलेला खुसखुशीतपणा आणि दाताखाली फुटणारा 'कड्' असा आवाज यामुळे हा पदार्थ दसऱ्याच्या नैवेद्यात अनिवार्य मानला जातो.

कडाकणीची धार्मिक परंपरा

सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात देवीच्या घटावर कडाकणी बांधण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी गावातून निघणाऱ्या देवीच्या पालखीला दोऱ्याने ओवलेली कडाकणी बांधली जाते. घराघरातील व मंदिरातील घटावरही कडाकणी बांधण्याची पद्धत अजूनही टिकून आहे.

कडाकणीची खास पाककृती

कडाकणीसाठी गव्हाचे पीठ, बेसन, गूळ, तूप आणि मसाल्यांचे (वेलची, जायफळ, सुंठ) सुंदर मिश्रण वापरले जाते. गुळाचे पाणी करून त्यात पीठ मळले जाते. पातळ लाटून मंद आचेवर तळले जाते. तळताना चमच्याने टोचे मारले जातात, जेणेकरून ती पुरीसारखी फुगणार नाही. थंड झाल्यावर मिळतो तोच तिचा खास कडकडीत खमंगपणा!

देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर हा पदार्थ घरातला प्रत्येकजण आवडीने खातो. काहींना नुसतीच कडाकणी आवडते, तर काहींना ती चहाबरोबर जास्त रुचते. खुसखुशीतपणा, गुळाचा गोडवा आणि मसाल्यांचा सुवास यामुळे कडाकणी दसऱ्याच्या नैवेद्यात एक वेगळाच मान मिळवते.

नवरात्र संपता-संपता दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण होणारी ही कडाकणी केवळ नैवेद्यापुरती मर्यादित न राहता, परंपरा आणि स्वाद यांचा अनोखा संगम आहे. दसऱ्याच्या गोड आठवणींमध्ये कडकडीत कडाकणीचा एक घास कायमच राहतो!

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी