आजकाल आपण दैनंदिन जीवनात इतके व्यस्त झालो आहोत की वेळ वाचवण्यासाठी छोटे-मोठे शॉर्टकट वापरणं ही एक सवयच बनली आहे. सकाळची धावपळ, त्यात घरकामांची घाई, या सगळ्यात फळं सोलणं, कापणं ही सगळी वेळखाऊ कामं वाटायला लागतात. म्हणूनच बऱ्याचदा आपण फळं आधीच कापून ठेवतो, जेणेकरून गरजेच्या वेळी हे काम थोडं सोपं होईल आणि वेळ वाचेल. पण मग अडचण अशी होते की ही कापलेली फळं लवकर खराब होतात, रंग बदलतो, चवही जाते आणि नंतर उपयोगच राहत नाही. अशा वेळी काही सोप्या ट्रिक्स वापरल्या, तर ही फळं पूढचे काही दिवस ताजी ठेवता येतात. खास वेळ वाचवण्यासाठी आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी हे उपाय नक्कीच उपयोगी पडतील.
चला, जाणून घेऊयात हे झटपट आणि सोप्पे उपाय -
➤ फळांवर लिंबू किंवा संत्र्याचा रस लावा:
सफरचंद, केळं किंवा पेरु यांसारखी फळे कापल्यावर ती हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. यामुळे त्या फळातून काही एन्झाईम बाहेर पडतात आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते. याच कारणामुळे सफरचंद किंवा इतर काही कापलेली फळं लवकर काळी पडायला लागतात. मग अशावेळी त्यावर थोडा लिंबाचा किंवा संत्र्याचा रस लावून ठेवा. यामुळे त्यांचा रंगही बदलणार नाही आणि ताजेपणाही राहील.
➤ हवाबंद डब्यांचा वापर करा:
एकदा का फळं कापून झाली की ती हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा, यामुळे ती हवेशी संपर्कात येणार नाहीत आणि लगेच खराबही होणार नाहीत.
➤ फॉइल रॅपमध्ये गुंडाळा:
जर हवाबंद डबे नसतील, तर कापलेली फळं एल्युमिनियम फॉइल किंवा प्लास्टिक रॅपमध्ये नीट गुंडाळा. हाही उपाय फळं ताजी ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो.
➤ काही फळं पाण्यात ठेवता येतात:
गाजर, सफरचंद यांसारखी काही फळं थेट पाण्यात ठेवून काही दिवस ताजी ठेवता येतात. हा उपाय खास करून उन्हाळ्यात अधिक फायदेशीर ठरतो.
➤ ओल्या पेपर टॉवेलचा वापर करा:
फ्रिज नसेल तरी चिंता नाही. कापलेली फळं ओल्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे त्यांचा ओलेपणा टिकून राहतो आणि ती पटकन सुकत नाहीत.