होळी २०२५ उत्सव जवळ येत आहे. होळी ही हिंदू चांद्र कालगणेनुसार येणारा शेवटचा सण आहे. हा सण उन्हाळ्यात येतो. उन्हाळा असल्यामुळे उन्हाची तीव्रता दूर करण्यासाठी भारतीय परंपरेत अनेक खाद्य पदार्थ बनवण्यात येतात. हे पदार्थ फक्त चवीपुरते नसतात तर त्यात आरोग्यलाभाचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. होळीला बनवण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये थंडाई एक शरीराला शीतलता देणारा पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. जाणून घ्या थंडाई कशी बनवतात आणि थंडाईचा मसाला घरीच कसा बनवावा.
थंडाई बनवण्याचे वेगवेगळे प्रकार
प्रदेशानुसार थंडाई बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी ओल्या मसाल्याची थंडाई करतात. तर हल्ली होळीच्या दिवशी रंग खेळताना मेहनत नको म्हणून काही ठिकाणी आधीच थंडाईचा सुका मसाला तयार करण्यात येतो. होळीला हा सुका मसाला दूध उकळून थंड करून त्यात टाकता येतो.
थंडाई ओला मसाला
थंडाई तयार करण्यासाठी प्रामुख्याने सुका मेवाचा भरपूर वापर करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने बदाम, काजू, पिस्ता यांचा वापर केला जातो. हा सर्व सुकामेवा होळीच्या आदल्या रात्रीच भिजत घालायचा असतो. पाण्यात भिजत घातलेला सुकामेवा सकाळी पाटावरवंट्यावर वाटण्याची पद्धत आहे. कारण मिक्सर ऐवजी पाटावरवंट्यावर वाटल्याने याला वेगळीच चव येते. हा मसाला केसर, विलायची घातलेल्या दुधात मिक्स करून थंडाई तयार करतात.
थंडाईसाठी सुका मसाला
होळीच्या दिवशी सर्वांनाच रंग खेळायचा असतो. त्यादिवशी वेळ वाचवण्यासाठी आता थंडाई बनवण्यासाठी सुका मसाला तयार केला जातो. हा सुका मसाला बाजारातही मिळतो. मात्र तुम्ही तो घरच्या घरी करू शकतात.
थंडाईसाठी सुका मसाला बनवण्याचे योग्य प्रमाण
१०० ग्रॅम काजू
१०० ग्रॅम पिस्ता
१०० ग्रॅम बदाम
१०० ग्रॅम खडीसाखर
४-६ टेबलस्पून खरबूज बिया
२ चमचे खसखस
२ चमचे बडीशेप
२/४ गुलाबाच्या पाकळ्या
३०-४० वेलची पूड
चिमूटभर केशर
सुकामसाला बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम काजू, पिस्ता, बदाम छान भाजून घ्या. भाजून त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर खडीसाखर देखील मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. सोबत खसखस ही हलकेच भाजून घ्या. वेलची खलबत्त्यात बारीक कुटून घ्या. त्यामध्ये गुलाब पाकळ्या, सर्व मिश्रण एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवा. होळीला दूध उकळून छान थंड झाल्यावर हा मसाला त्यात घाला. थंडाई लगेच तयार होईल.