दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करताना आपण अनेकदा दिसेल तो प्लॅन निवडतो. मात्र, प्लॅनची किंमत पाहण्यासोबतच डेटा, व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च यांची तुलना केली, तर रिचार्जचा खर्च कमी करता येऊ शकतो. योग्य प्लॅन निवडण्यासाठी या ३ सोप्या ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा.
अधिकृत ॲपवर प्लॅन तपासा
गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमवर रिचार्जचे अनेक पर्याय दिसतात. मात्र, तुमच्या टेलिकॉम कंपनीचे सर्व प्लॅन किंवा विशेष ऑफर्स तिथे दिसतीलच असे नाही. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकृत ॲपवर प्लॅन्स तपासा. जिओ ग्राहकांनी मायजिओ, तर एअरटेल ग्राहकांनी एअरटेल थँक्स ॲपवर उपलब्ध ऑफर्स पाहाव्यात. काही अतिरिक्त डेटा व्हाउचर किंवा विशेष ऑफर्सही तिथे मिळू शकतात.
इंटरनेट नसेल तर USSD कोडची मदत घ्या
इंटरनेट उपलब्ध नसेल किंवा ॲप वापरणं शक्य नसेल, तरी रिचार्ज प्लॅन तपासता येतात. यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकृत USSD कोडचा वापर करता येतो. एअरटेल ग्राहक *121# किंवा 1212# डायल करून उपलब्ध प्लॅन्स आणि ऑफर्सची माहिती घेऊ शकतात. जिओ ग्राहक 199 वर रिकामा मेसेज पाठवून किंवा अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉटवर ‘Hi’ पाठवून आपल्या नंबरसाठी उपलब्ध ऑफर्स तपासू शकतात. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी डेटा, व्हॅलिडिटी आणि इतर फायदे सहज तपासता येतात.
फक्त किंमत नाही, रोजचा खर्च पाहा
रिचार्ज निवडताना केवळ २८ दिवसांच्या प्लॅनची किंमत पाहण्याऐवजी त्याची रोजची किंमत किती पडते, हेही तपासा. उदाहरणार्थ, ५६ किंवा ८४ दिवसांचा प्लॅन सुरुवातीला महाग वाटू शकतो; पण रोजच्या हिशोबाने तो स्वस्त पडण्याची शक्यता असते. त्यामुळे किंमत + व्हॅलिडिटी + पर डे कॉस्ट + डेटा या चार गोष्टींची तुलना करूनच रिचार्ज निवडणे फायदेशीर ठरू शकते.
प्लॅन्स आणि ऑफर्स वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी अधिकृत ॲप किंवा USSDवर एकदा माहिती तपासा. 'गुप्त स्वस्त प्लॅन' नेहमीच उपलब्ध नसतात; मात्र एक्सक्लुझिव्ह ऑफर्स अधिकृत ॲपवर मिळू शकतात.