Freepik
लाईफस्टाईल

मुंबईत मधुमेहामुळे सर्वाधिक मृत्यू;जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दशकभरात ४८५ टक्के वाढ

२०१४ ते २०२३ या दहा वर्षांतील रुग्णालयीन नोंदीचा अभ्यास केल्यानंतर मुंबईत जीवनशैलीशी निगडित अशा मधुमेहांसारख्या आजारांनी होत असलेल्या मृत्यूंची संख्या ४८५ टक्क्यांनी वाढली आहे.

Swapnil S

मुंबई : २०१४ ते २०२३ या दहा वर्षांतील रुग्णालयीन नोंदीचा अभ्यास केल्यानंतर मुंबईत जीवनशैलीशी निगडित अशा मधुमेहांसारख्या आजारांनी होत असलेल्या मृत्यूंची संख्या ४८५ टक्क्यांनी वाढली आहे. मृत्यूंच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वात वरचे कारण आहे, असे प्रजा फाऊंडेशन संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार, मुंबईत गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक रुग्ण हे डायरिया किंवा अतिसार (९ लाख ३६ हजार ६१), क्षयरोग (३ लाख ८९ हजार ८०३), उच्च रक्तदाब (३ लाख ७० हजार ७९५), मधुमेह (३ लाख ७० हजार ८१) आणि डेंग्यू (१ लाख ३९ हजार ८९२) याप्रमाणे आहेत. २०१४ ते २०२२ या काळात झालेल्या मृत्यूंच्या कारणांचा विचार केला असता त्यात मधुमेह, श्वसनाचे गंभीर आजार, क्षयरोग आणि उच्च रक्तदाब यांचा क्रमांक लागतो. जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारांनी २०१४ मध्ये २,४२८ मृत्यू झाले, तर २०२२ पर्यंत ते १४ हजार २०७ वर पोहोचले. ही वाढ ४८५ टक्के आहे.

प्रजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारखे आजार आटोक्यात आणण्यासाठी शहरी नियोजन आणि विकासाच्या संदर्भात भारत सरकारचे शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी (यूआरडीपीएफआय) धोरण दिशादर्शक ठरते. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेने केली पाहिजे. व्यक्तीचे आरोग्य आणि रोजच्या शारिरीक हालचालींकरिता शहरात दरडोई किमान १० चौरस मीटर खुली जागा उपलब्ध असली पाहिजे, अशी शिफारस या धोरणात आहे. मात्र मुंबई विकास आराखडा २०१४ ते २०३४मध्ये दरडोई केवळ तीन चौरस मीटर खुली जागा प्रस्तावित केली आहे. ही मोकळी जागा वाढविली पाहिजे. नागरिकांसाठीच्या पायाभूत सुविधासुद्धा वाढविल्या पाहिजेत.

नियोजनाचे विकेंद्रीकरण व्हावे

मुंबईत लोकांच्या आरोग्यासाठी मोकळ्या जागा वाढवायच्या असतील तर सध्या ज्या जागा आराखड्यात राखून ठेवल्या आहेत, त्या तत्काळ ताब्यात घेतल्या पाहिजेत. मुंबईला पश्चिम आणि पूर्व समुद्रकिनाऱ्याच्या रूपाने मोठी खुली जागा असली तरी ती लोकांसाठी उपलब्ध होत नाही. मुंबईच्या मधोमध राष्ट्रीय उद्यान असून तेथेही लोकांना मुक्त प्रवेश नाही. राजकीय नेतृत्व याबाबत उदासीन आहे. शहर नियोजनाचे काम विभागस्तरावर केल्यास लोकांना मोकळ्या जागा सहजपणे उपलब्ध होतील. त्यासाठी नियोजनाचे विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, असे मत प्रजाचे मिलिंद म्हस्के यांनी व्यक्त केले.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश