लाईफस्टाईल

Nag Panchami 2025 : यंदा नागपंचमी २९ जुलै रोजी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि धार्मिक महत्त्व

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीचे मुहूर्त, महत्त्व, आणि पूजाविधी यांविषयी थोडक्यात माहिती घेऊया...

Mayuri Gawade

महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. त्यामुळेच नागपूजेला भगवान शिव आणि विष्णू या दोघांच्याही भक्तिपंथात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना हा शिवभक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो, आणि याच महिन्यात येणाऱ्या नागपंचमीस पूजाविधी, परंपरा आणि श्रद्धेचा एक विशेष दिवस म्हणून पाहिलं जातं.

या पार्श्वभूमीवर नागपंचमीचे मुहूर्त, महत्त्व, आणि पूजाविधी यांविषयी थोडक्यात माहिती घेऊया...

नागपंचमीचे महत्त्व

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. शेतीप्रधान संस्कृतीमध्ये सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीला धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभले आहे.

या दिवशी अनंत (शेषनाग), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची विधिवत पूजा केली जाते. त्याचप्रमाणे नाग हे महादेवांच्या प्रमुख प्रतिकांपैकी एक मानले जाते. श्रावण महिना हा शिवभक्तीचा विशेष काळ मानला जात असल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेचे महत्त्व अधिकच वाढते.

नागपंचमी मुहूर्त

यंदा २९ जुलै २०२५ रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल. नागपंचमीची तिथी सोमवार, २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवार, २९ जुलै रोजी रात्री १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार मंगळवार, २९ जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल.

नागपंचमी साजरी करण्याचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील.

नागपंचमी पूजा कशी करावी?

या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र रेखाटावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी. नागदेवतेला दूध व लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यासोबत दूर्वा, दही, गंध, अक्षता आणि फुले वाहून विधिपूर्वक पूजा केली जाते. पूजनादरम्यान – "नमोऽस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु! ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः!" हा मंत्र उच्चारला जातो.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने कालसर्प योग व सर्पदोष यांचा प्रभाव कमी होतो, अशी मान्यता आहे. तसेच कुटुंबात सर्पभय राहात नाही, असे भविष्यपुराणात नमूद आहे. यासाठी नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणाने नागमूर्ती तयार करून त्यावर दूर्वा व शेंदूर लावावा.

या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत, असे अनेक संकेत आहेत. या परंपरांमागे अनेक लोककथाही प्रचलित आहेत.

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे.)

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास