मुंबई : एसटीने नियमित प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही एसटीच्या सवलतीचा लाभ घेत असाल आणि अजूनही NCMC कार्ड काढले नसेल, तर आता नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. कारण १ ऑक्टोबर २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. मात्र, कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष कार्ड हातात येईपर्यंत सवलत बंद होणार का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्यासाठीही एसटीने पर्यायी व्यवस्था केली आहे. नोंदणीनंतर मिळणारी QR कोडयुक्त पावती दाखवून ३० दिवसांपर्यंत सवलतीचे तिकीट घेता येणार आहे.
NCMC कार्डसाठी कुठे कराल नोंदणी?
NCMC कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया राज्यभरातील एसटी बसस्थानके आणि आगारांमध्ये सुरू आहे. याशिवाय आगाराबाहेरील अधिकृत केंद्रांवरही नोंदणी करता येईल. NCMC कार्डच्या नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची अधिकृत एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांनी जवळच्या एसटी आगार, बसस्थानक किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक?
NCMC कार्डसाठी नोंदणी करताना आधार कार्ड आवश्यक आहे. आधारच्या माध्यमातून पात्र प्रवाशाची ओळख आणि लाभार्थी म्हणून पडताळणी केली जाते. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार नवीन स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाते.
बोटांचे ठसे जुळले नाहीत तर काय?
ज्येष्ठ नागरिकांना बायोमेट्रिक पडताळणी करताना बोटांचे ठसे जुळत नसल्याची अडचण येऊ शकते. अशा वेळीही नोंदणी थांबणार नाही. आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून NCMC कार्डसाठी नोंदणी करता येते.
कार्ड अजून मिळाले नसेल तर सवलत मिळणार?
हो. NCMC कार्डसाठी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशाला QR कोड असलेली नोंदणी पावती दिली जाते. प्रत्यक्ष कार्ड मिळेपर्यंत ही पावती सवलतीच्या प्रवासासाठी वापरता येणार आहे.
एसटी बसमध्ये तिकीट घेताना ही पावती वाहकाला दाखवावी लागेल. वाहक इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनच्या माध्यमातून पावतीवरील QR कोड स्कॅन करेल. त्यानंतर प्रवाशाच्या पात्रतेनुसार सवलतीचे तिकीट दिले जाईल.
QR कोडची पावती किती दिवस वैध?
नोंदणीनंतर मिळणारी QR कोडयुक्त पावती ३० दिवसांसाठी वैध असेल. म्हणजेच ही केवळ तात्पुरती सुविधा आहे. या कालावधीत प्रवाशाने NCMC कार्ड मिळवून ते Active करणे आणि त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे. त्यानंतर सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डच वापरावे लागेल.
NCMC कार्डमध्ये पैसे कसे भरायचे?
कार्ड मिळाल्यानंतर प्रत्येक वेळी रिचार्ज करण्यासाठी एसटी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. ५ सप्टेंबरपासून BHIM Appच्या माध्यमातून NCMC कार्डचे Top-up करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यासाठी BHIM App उघडून NCMC कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड स्कॅन करावा. त्यानंतर आवश्यक रक्कम भरून Top-upची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
१ ऑक्टोबरपूर्वी नोंदणी का महत्त्वाची?
१ ऑक्टोबरपासून सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्डची व्यवस्था लागू होणार असल्याने पात्र प्रवाशांनी नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कार्ड मिळण्यास काही दिवस लागले तरी नोंदणीनंतर मिळालेली QR कोडची पावती ३० दिवसांसाठी सवलतीचा लाभ घेण्यासाठी वापरता येणार आहे.
त्यामुळे शेवटच्या क्षणाची धावपळ टाळण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी जवळच्या एसटी आगार किंवा बसस्थानकात जाऊन NCMC कार्डसाठी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.