३१ डिसेंबरचं सेलिब्रेशन घरी करताय? रात्रीच्या जेवणात करा काहीतरी स्पेशल; 'ही' घ्या मेन्यू लिस्ट 
लाईफस्टाईल

३१ डिसेंबरचं सेलिब्रेशन घरी करताय? रात्रीच्या जेवणात करा काहीतरी स्पेशल; 'ही' घ्या मेन्यू लिस्ट

अगदी स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत... घरच्या घरी सेलिब्रेशन करताना रेस्टॉरंटसारखी मजा मिळावी आणि खाणंही झटपट व्हावं, यासाठी हा मेन्यू नक्की उपयोगी ठरेल.

Mayuri Gawade

३१ डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नववर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. घरच्या घरी हा आनंद साजरा करताना कुटुंबातील मंडळी, मित्रमंडळी आपल्या सोबत असावीत असं आपल्याला वाटतं. अशा संध्याकाळी गेट-टु-गेदर प्लॅन करताना अनेकांना "खायला काय करायचं?" असा प्रश्न पडतो. सतत विकतचे पदार्थ नको असतील तर, घरीच झटपट आणि स्वादिष्ट जेवण तयार करून संपूर्ण घरच्या मंडळींचे पोट भरणे आणि सर्वांना खुश ठेवणे शक्य आहे.

अगदी स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत... घरच्या घरी सेलिब्रेशन करताना रेस्टॉरंटसारखी मजा मिळावी आणि खाणंही झटपट व्हावं, यासाठी हा मेन्यू नक्की उपयोगी ठरेल.

स्टार्टर्स

१) मलाई पनीर क्यूब्स

साहित्य :

  • पनीर - २५० ग्रॅम (क्यूब्समध्ये कापलेले)

  • फ्रेश क्रीम (मलई) - ३ टेबलस्पून

  • दही - २ टेबलस्पून

  • आले-लसूण पेस्ट -१ टीस्पून

  • मिरपूड पावडर - ½ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • बटर / तेल - भाजण्यासाठी

कृती :

एका बाऊलमध्ये मलई, दही, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि मिरपूड एकत्र मिसळा. त्यात पनीरचे तुकडे घालून २०–३० मिनिटे मॅरिनेट करा. नंतर तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडं बटर घालून पनीर क्यूब्स हलके सोनेरी होईपर्यंत भाजा. गरम गरम सर्व्ह करा.

................................

२) कॉर्न-भाजी टिक्की

साहित्य :

  • उकडलेला स्वीट कॉर्न - १ कप

  • उकडलेला बटाटा - १ मध्यम

  • गाजर, बीन्स (बारीक चिरलेले) - ½ कप

  • हिरवी मिरची - १ (बारीक)

  • कोथिंबीर - थोडी

  • ब्रेडक्रम्ब्स / बेसन - २ टेबलस्पून

  • मीठ, मिरपूड - चवीनुसार

  • तेल - तळण्यासाठी

कृती :

सर्व भाज्या आणि कॉर्न एकत्र करून त्यात बटाटा कुस्करून मिसळा. मीठ, मिरपूड, मिरची आणि कोथिंबीर घालून टिक्कीचा आकार द्या. तव्यावर थोड्या तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.

................................

मेन कोर्स

व्हेज दम बिर्याणी + रायता

व्हेज दम बिर्याणी साहित्य :

  • बासमती तांदूळ - २ कप

  • मिक्स भाज्या (फुलकोबी, गाजर, मटार, बीन्स) - २ कप

  • कांदा - २ (तळलेले)

  • दही - ½ कप

  • बिर्याणी मसाला - २ टीस्पून

  • आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून

  • केशर / केवडा पाणी - थोडे

  • तूप / तेल - आवश्यकतेनुसार

  • मीठ - चवीनुसार

कृती :

तांदूळ अर्धवट शिजवून ठेवा. दुसरीकडे भाज्या दही, मसाले आणि आले-लसूण पेस्टसोबत शिजवा. भांड्यात आधी भाज्यांचा थर, मग तांदूळ असा थर लावा. वर तळलेला कांदा, केशर पाणी घाला. झाकण ठेवून मंद आचेवर १५–२० मिनिटे दम द्या.

................................

रायता साहित्य :

  • दही - १ कप

  • कांदा / काकडी (बारीक) - ½ कप

  • मीठ, भाजलेलं जिरे पूड - चवीनुसार

कृती :

सर्व साहित्य एकत्र करून नीट मिसळा. थंडगार सर्व्ह करा.

................................

ड्रिंक्स

वर्जिन मोईतो (Virjin Mojito)

साहित्य :

  • लिंबाचा रस - २ टेबलस्पून

  • पुदिन्याची पाने - ८-१०

  • साखर - १-२ टीस्पून

  • सोडा - १ ग्लास

  • बर्फ - आवश्यकतेनुसार

कृती :

ग्लासमध्ये पुदिना, साखर आणि लिंबाचा रस हलकासा मॅश करा. बर्फ घालून वरून सोडा ओता. लगेच सर्व्ह करा.

................................

डेझर्ट

गुलाब जामुन

साहित्य :

  • गुलाब जामुन मिक्स - १ पॅकेट

  • साखर - २ कप

  • पाणी - २ कप

  • वेलची - २

  • तेल / तूप - तळण्यासाठी

कृती :

गुलाब जामुन मिक्सपासून मऊ गोळे तयार करा. मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. साखर, पाणी आणि वेलची घालून पाक तयार करून त्यात गरम जामुन घाला. १-२ तास भिजू द्या.

Mumbai : कंत्राटदाराला दोन वर्षे बंदी, नोंदणीही रद्द; गाळ काढण्यासाठी बालकामगाराचा वापर पडला भारी; पालिकेकडून कारवाई

Ulhasnagar : प्रेमाला जीवघेणा विरोध; आईने केला मुलीचा खून

औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप; MPSC कडून गंभीर दखल; पोलिसांत तक्रार दाखल होणार

Mumbai : चिंता मिटली! धरणात ३१२ दिवसांचा ८८.४० टक्के पाणीसाठा

दक्षिण मुंबईला मिळणार पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र; मुंबई पोर्टकडून DPR साठी तांत्रिक सल्लागारांची मागणी