संध्याकाळी अचानक भूक लागली आणि स्वयंपाकघरात फारशी तयारीही नसेल, तर काही मिनिटांत तयार होणारा पदार्थ उपयोगी ठरतो. रोजच्या ब्रेड-बटर किंवा सँडविचपेक्षा थोडं वेगळं खायचं असेल, तर कांदा-टोमॅटो बन हा सोपा पर्याय ठरू शकतो. घरात सहज मिळणारा कांदा, टोमॅटो आणि नेहमीचे मसाले वापरून यासाठी चटपटीत सारण तयार करता येते. त्यात चीज घालून बन तव्यावर खरपूस भाजला की चहासोबत किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी गरमागरम स्नॅक तयार होतो.
लागणारे साहित्य
बन पाव - ४
कांदे - २
टोमॅटो - ३
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
जिरे - १ चमचा
हिरवी मिरची - आवडीनुसार
हळद - १ चमचा
लाल तिखट - दीड छोटा चमचा
गरम मसाला - दीड छोटा चमचा
साखर - अर्धा छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
किसलेले चीज - आवश्यकतेनुसार
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
तेल - २ मोठे चमचे
तूप किंवा बटर - भाजण्यासाठी
कांदा-टोमॅटो बन कसा कराल?
सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून थोडं परतून घ्या. त्यानंतर चिरलेला कांदा घालून तो मऊ आणि किंचित गुलाबी होईपर्यंत परता.
आता त्यात टोमॅटो घालून हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि थोडी साखर मिसळा. मिश्रण मध्यम आचेवर काही मिनिटे शिजवा. टोमॅटो पूर्णपणे मऊ झाल्यानंतर आणि मसाल्यातील ओलावा कमी झाल्यानंतर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालू शकता.
बन पूर्णपणे दोन भागांत न कापता मधोमध चीर द्या. तयार कांदा-टोमॅटोचे सारण त्यात भरून वरून किसलेले चीज घाला.
तव्यावर थोडं बटर किंवा तूप गरम करा. त्यावर भरलेला बन ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. बन बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत झाला की तो सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
चहासोबत झटपट स्नॅक
हा बन टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा गरम चहासोबत देता येतो. चीज टाळायचं असेल तर त्याशिवायही ही रेसिपी करता येते. सकाळच्या घाईत किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हा झटपट पर्याय उपयोगी ठरू शकतो.