अळूवडी म्हटलं की अनेकांना मोठा तामझाम आणि तासन्तासांची मेहनत आठवते. त्यामुळे हा पदार्थ सणासुदीला किंवा निवांत वेळ असतानाच करायचा, असं अनेकांना वाटतं. पण अळूवडी करण्यासाठी फार मोठा घाट घालण्याची गरज नाही. योग्य पद्धत आणि सोपी रेसिपी फॉलो केली तर ही खमंग वडी झटपट तयार करता येते. श्रावणात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल, तर ही सोपी अळूवडीचा रेसिपी नक्की ट्राय करा..
साहित्य
३-४ अळूची ताजी पाने
१ कप बेसन
२ चमचे तांदळाचे पीठ
२ चमचे चिंच-गुळाचा कोळ
२ चमचे पांढरे तीळ
१ चमचा आले-लसूण पेस्ट
हळद, तिखट, जिरे-धणे पूड, हिंग
गरम मसाला आणि चवीनुसार मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम अळूच्या पानांच्या मागील बाजूच्या जाड शिरा लाटण्याने चपट्या करून घ्या. एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, मसाले, चिंच-गुळाचा कोळ, तीळ आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करा. थोडे पाणी घालून घट्टसर लेप तयार करा.
सर्वात मोठे पान उलटे ठेवून त्यावर लेप लावा. त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा लेप लावा. अशा प्रकारे ३-४ पानांचे थर करून घट्ट रोल तयार करा. हा रोल १५-२० मिनिटे वाफवून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या गोल वड्या कापा आणि गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा किंवा शॅलो फ्राय करा. तयार आहेत खमंग अळूवड्या!