नवरात्र हा भक्ती, उत्साह आणि घराघरात रंगत भरणारा सण आहे. या काळात पारंपरिक गोड पदार्थ केवळ चव वाढवण्यासाठी नाहीत, तर घरातील आनंद आणि प्रेम व्यक्त करण्याचे प्रतीकही असतात. साखर–खोबऱ्याची पोळी ही अशाच खास पाककृतींपैकी एक आहे, जी नवरात्र उत्सवाला आणखी गोडसर बनवते. सोपी, चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणारी ही पोळी तुमच्या घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि सणाचा आनंद वाढवेल.
मैदा - अर्धा कप
चिरोट्याचा रवा - २ चमचे
तेल - अर्धा कप
तूप - अर्धा कप
पाणी - १ कप
चिमूटभर वेलची पूड
पिठी साखर - १ कप
किसलेले सुके खोबरे - १ कप
बाउलमध्ये मैदा, चिरोट्याचा रवा आणि थोडे मीठ एकत्र करा आणि सर्व साहित्य नीट मिक्स करा. त्यात थोडे तेल घालून मिश्रण एकजीव करा. नंतर थोडे-थोडे पाणी ओतून पीठ मळा आणि २-३ तास बाजूला ठेवून सेट होऊ द्या. यावेळी दुसऱ्या बाउलमध्ये सारण तयार करा. बारीक किसलेले सुके खोबरे, पिठी साखर आणि चिमूटभर वेलची पूड एकत्र करा. आवश्यकतेनुसार तूप मिसळा आणि तयार सारणाचे लहान लाडू वळून ठेवा. सेट झालेल्या पिठाचे लहान गोळे करून त्याला पुरीसारखा आकार द्या आणि प्रत्येक गोळ्यात मोदकासारखे सारण भरा. हलक्या हाताने पोळी लाटून गरम पॅनवर दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. अशा प्रकारे साखर-खोबऱ्याची पोळी तयार होते.