नाश्ता म्हटलं की बहुतेक घरात पोहे हमखास असतात. कधी कांदे पोहे, कधी बटाटा पोहे… पण रोज तीच चव खाऊन कंटाळा येतो. मात्र, हेच पोहे थोड्या वेगळ्या पद्धतीने केले तर नाश्त्याची मजाच बदलते. विशेष म्हणजे, भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहे ७ पेक्षा जास्त भन्नाट स्टाइल्समध्ये बनवले जातात.आज आपण अशाच ७ वेगळ्या, झटपट आणि घरच्या घरी करता येणाऱ्या पोह्यांच्या स्टाइल्स पाहणार आहोत, ज्यामुळे रोजचे पोहे ‘स्पेशल’ वाटतील!
चला तर मग, पाहूया पोह्यांचे ७ भन्नाट प्रकार…
१. महाराष्ट्राचे पारंपरिक कांदे पोहे
साहित्य:
जाड पोहे, कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची, मोहरी, हळद, तूप, मीठ, साखर, लिंबू, कोथिंबीर
कृती:
पोहे धुऊन मोकळे ठेवा. कढईत तूप घालून मोहरी, शेंगदाणे, मिरची आणि कांदा परता. हळद, मीठ, साखर घालून पोहे मिसळा. वाफ काढून लिंबू व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
२. बंगाली चिरेर पुलाव (गोड-खारट पोहे)
साहित्य:
पोहे, कांदा, शेंगदाणे, मोहरी, हिरवी मिरची, गूळ/साखर, मीठ
कृती:
मोहरीची फोडणी देऊन कांदा परता. शेंगदाणे, मिरची घालून पोहे मिसळा. थोडी साखर किंवा गूळ घालून हलकी गोड-खारट चव तयार करा.
३. दही पोहे (झटपट आणि थंडगार)
साहित्य:
पोहे, दही, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, सुकामेवा
कृती:
पोहे दह्यात भिजवा. वेगळ्या कढईत फोडणी करून दह्याच्या पोह्यांवर घाला. वरून भाजलेले काजू-बदाम टाका.
४. कर्नाटकचे गोज्जू अवलक्की
साहित्य:
पोहे, चिंच, गूळ, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट
कृती:
चिंच-गूळ पाणी करून ठेवा. फोडणीत मोहरी, कढीपत्ता घालून पोहे परता. वरून चिंच-गुळाचं मिश्रण घालून हलवा.
५. इंदोरी पोहे
साहित्य:
पोहे, कांदा, जीरावण मसाला, मोहरी, बडीशेप, कोथिंबीर
कृती:
फोडणीत कांदा परतून पोहे घाला. वरून जीरावण मसाला भुरभुरवा. लिंबू आणि कोथिंबीर घालून खास इंदोरी टेस्ट मिळवा.
६. नागपूर तर्री पोहा
साहित्य:
पोहे, चणे, कांदा, सावजी मसाला, तेल
कृती:
पोहे वेगळे ठेवा. सावजी मसाल्याची झणझणीत तर्री तयार करून गरम पोह्यांवर ओता. वरून कांदा-चिवडा टाका.
७. गुजराती बटाटा पोहा
साहित्य:
पोहे, बटाटे, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, साखर
कृती:
बटाटे आणि मसाले परता. पोहे घालून थोडी साखर व लिंबू टाका. हलकी गोडसर चव तयार होते.
पोहे म्हणजे फक्त साधा नाश्ता नाही, तर प्रत्येक राज्याची वेगळी चव आणि ओळख आहे.
एकदम हलके दही पोहे असोत, की झणझणीत तर्री पोहे हे ७ प्रकार एकदा करून पाहाच.
रोजचे पोहे आता कधीच कंटाळवाणे वाटणार नाहीत!