चिकनचे विविध पदार्थ अनेकांना आवडतात, पण कर्नाटकातील चिकन घी रोस्ट हा पदार्थ त्याच्या तिखट, मसालेदार आणि तुपाच्या खास चवीमुळे वेगळी ओळख निर्माण करतो. योग्य मसाले, बेगडी मिरची आणि तुपाचा सुगंध यामुळे हा पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो. तुम्हालाही घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा चिकन घी रोस्ट बनवायचा असेल, तर ही सोपी रेसिपी आणि काही महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा.
साहित्य :
५०० ग्रॅम हाडांसह चिकन
८ ते १० बेगडी मिरच्या
२ टेबलस्पून धणे
१ टीस्पून जिरे
१ टीस्पून काळी मिरी
अर्धा टीस्पून मेथी दाणे
अर्धा कप दही
४ टेबलस्पून तूप
१ टेबलस्पून गूळ
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी कढीपत्ता
कृती :
मसाला तयार करा - बेगडी मिरच्या १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर धणे, जिरे, काळी मिरी आणि मेथी दाणे यांच्यासोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून गुळगुळीत मसाला तयार करा.
चिकन मॅरिनेट करा - एका भांड्यात चिकन, दही आणि थोडे मीठ घालून चांगले मिसळा. हे मिश्रण ३० मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.
मसाला भाजून घ्या - कढईत तूप गरम करून तयार मसाला मंद आचेवर परता. मसाल्यातून छान सुगंध येईपर्यंत आणि तो चमकदार दिसेपर्यंत भाजत राहा.
चिकन शिजवा - आता मॅरिनेट केलेले चिकन मसाल्यात घालून मंद आचेवर शिजवा. मध्ये-मध्ये हलवत राहा, जेणेकरून मसाला चिकनला व्यवस्थित लागेल.
शेवटचा टच द्या - चिकन पूर्ण शिजल्यानंतर त्यात गूळ आणि चवीनुसार मीठ घाला. शेवटी एक चमचा तूप घालून कढीपत्त्याने सजवा.
परफेक्ट चिकन घी रोस्टसाठी खास टिप्स :
१. हाडांसह चिकन वापरा - हाडांसह चिकन वापरल्यास मसाल्याचा स्वाद अधिक चांगला मुरतो आणि चिकन रसाळ राहते.
२. बेगडी मिरचीच वापरा - या मिरचीमुळे चिकन घी रोस्टला आकर्षक लाल रंग आणि हलका तिखटपणा मिळतो.
३. मसाला व्यवस्थित भाजा - मसाला घाईत न भाजता मंद आचेवर भाजल्यास त्याचा सुगंध आणि चव अधिक खुलते.
४. मंद आचेवर शिजवा - मंद आचेवर चिकन शिजवल्याने मसाला प्रत्येक तुकड्यात व्यवस्थित मुरतो आणि चिकन मऊ राहते.
५. शेवटी तूप घालायला विसरू नका - शेवटी एक चमचा तूप घातल्याने या पदार्थाला अस्सल घी रोस्टची चव, सुगंध आणि चमकदार पोत मिळतो.
६. गुळाचा वापर करा - थोडासा गूळ घातल्याने तिखट आणि मसालेदार चवीचा समतोल राखला जातो.
७. सोबत काय सर्व्ह कराल?
चिकन घी रोस्ट डोसा, अप्पम, जिरा राईस किंवा गरम फुलक्यांसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव अधिक चांगली लागते.