इस्लाम धर्मात पवित्र मानला गेलेला रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास ठेवून अल्लाहची इबादत करतात. रोजा सोडताना इफ्तार पार्टीत Rooh Afza (रूह अफजा) हे एक पारंपारिक पेय बनवण्याची पद्धत आहे. मात्र, रोज रोज हे पेय पिऊन कंटाळा आला असेल तर इथे एक खास स्वादिष्ट रूह अफजा आईस्क्रीम रेसिपी आहे. जी तुम्हाला रूह अफजाची चवही देईल आणि थोडी वेगळी रिट्रिटही मिळेल. जाणून घ्या साहित्य आणि कृती-
साहित्य
१ कप हेवी क्रीम
½ कप रूह अफजा
½ टीस्पून मैदा
½ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
२ टीस्पून साखर (तुमच्या आवडीनुसार घाला)
इथे फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये शिका रूह अफजा आईस्क्रीम कशी बनवायची?
कृती
स्टेप १
एका मोठ्या पातेल्यात हेवी क्रीम घेऊन ते मऊ आणि मलाईदार होईपर्यंत फेटा.
स्टेप २
फेटलेल्या क्रीममध्ये रूह अफजा सिरप घाला आणि चांगले एकत्र होईपर्यंत मिक्स करा. नंतर यामध्ये मैदा, व्हॅनिला इसेन्स आणि तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर साखर घाला.
स्टेप ३
हे सर्व घटक एकत्रिक करून पुन्हा एकदा हे मिश्रण छान फेटा. एक जाड मलाईदार मिश्रण तयार होईपर्यंत हे मिश्रण फेटत राहा.
स्टेप ४
मिश्रण एका कंटेनरमध्ये ओता, वरचा भाग गुळगुळीत करून घ्या. आणखी छान चव येण्यासाठी वरून पुन्हा आणखी थोडा रूह अफजा सिरप घाला. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा.
स्टेप ५
फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर स्कूप करून सर्व्ह करण्यापूर्वी आईस्क्रीम काही मिनिटे तशीच राहू द्या. नंतर कपमध्ये छान सर्व्ह करा.
रूह अफजा आईस्क्रीमचा व्हिडिओ पाहा
रूह अफजा काय आहे?
रूह अफजा हा रमजानमधील एक महत्त्वाचा पेय पदार्थ आहे. विशेषतः इफ्तारसाठी हे पेय बनवले जाते. याच्या ताजेतवाने आणि हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे बराच वेळ उपवास केल्यानंतर, ते ऊर्जा भरण्यास आणि ग्लुकोजची पातळी पुनर्संचयित करण्यास मदत करते. हे पेय औषधी वनस्पती, फळे आणि फुलांच्या अर्कांपासून बनवलेले असते. ते पचनास मदत करते आणि आम्लता रोखते. त्याचा थंड प्रभाव शरीराला शांत करतो, ज्यामुळे रमजानमध्ये ते एक परिपूर्ण पेय बनते.
पेय पदार्थांव्यतिरिक्त, रूह अफजा मिष्टान्न, स्मूदी, फालूदा आणि खीर सारख्या पारंपारिक पदार्थांमध्ये वापरला जातो. त्याच्या सांस्कृतिक महत्त्व आणि पिढ्यानपिढ्या जुन्या परंपरेमुळे, हे प्रिय सरबत रमजानमध्ये असणे आवश्यक आहे. जे उपवास केल्यानंतर चव आणि पोषण दोन्ही देते.