Winter Health : थंडीत सकाळी उठल्यावर चहा-कॉफीऐवजी आधी पाणी प्या; शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Winter Health : थंडीत सकाळी उठल्यावर चहा-कॉफीऐवजी आधी पाणी प्या; शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

हिवाळ्यात तहान कमी लागल्यामुळे पाणी पिणंही कमी होतं. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास कोणती ६ लक्षणं दिसतात आणि थंडीत पुरेसं पाणी पिण्यासाठी काय करावं, जाणून घ्या.

Mayuri Gawade

हिवाळ्यात सकाळी उठल्यावर अनेकांना गरमागरम चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते. थंडीमुळे तहानही फारशी जाणवत नाही. त्यामुळे दिवसभरात पाणी पिण्याचे प्रमाण नकळत कमी होते. मात्र, थंडीत तहान कमी लागली तरी शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही. उलट, शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी या ऋतूतही पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

झोपेत असतानाही शरीरातून श्वासोच्छवास, घाम आणि लघवीच्या माध्यमातून पाणी बाहेर पडत असते. त्यामुळे रात्री अनेक तास पाणी न प्यायल्यानंतर सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणे ही चांगली सवय ठरू शकते. यामुळे शरीराला पुन्हा द्रवपदार्थ मिळण्यास मदत होते. मात्र, केवळ सकाळी पाणी पिण्यापेक्षा दिवसभर शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे अधिक महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता का जाणवू शकते?

उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे आपल्याला वारंवार तहान लागते. मात्र, हिवाळ्यात थंड हवामानामुळे तहान कमी जाणवते आणि पाणी पिण्याचे प्रमाणही नकळत कमी होते. याबाबत Mayo Clinic नेही नमूद केले आहे की, थंड आणि कोरड्या हवेमुळे शरीरातील ओलावा कमी होऊ शकतो. शिवाय, श्वासोच्छवासातूनही शरीरातील पाणी बाहेर पडत असते. त्यामुळे तहान कमी लागली तरी हिवाळ्यात नियमित अंतराने पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

शरीरात पाण्याची कमतरता असल्याची लक्षणे कोणती?

शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास काही लक्षणे दिसू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये.

  • लघवीचा रंग गडद होणे : लघवी नेहमीपेक्षा गडद पिवळ्या रंगाची दिसू शकते.

  • लघवीचे प्रमाण कमी होणे : नेहमीच्या तुलनेत लघवी कमी होणे हेही पाण्याची कमतरता दर्शवू शकते.

  • तोंड कोरडे पडणे : तोंड आणि घसा कोरडा जाणवू शकतो.

  • थकवा जाणवणे : पुरेसे पाणी न प्यायल्यास अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो.

  • चक्कर येणे : काही वेळा डोके हलके होणे किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.

  • जास्त तहान लागणे : शरीराला पाण्याची गरज असल्याचे हे एक सामान्य लक्षण आहे.

गंभीर पाण्याच्या कमतरतेमध्ये गोंधळल्यासारखे वाटणे, बेशुद्ध पडणे, लघवी अजिबात न होणे किंवा हृदयाचे ठोके वेगाने वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काय करावे?

थंडीच्या दिवसांत पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी रोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल करता येतात.

१. सकाळी उठल्यावर पाणी प्या : रात्री झोपल्यानंतर अनेक तास पाणी प्यायलेले नसते. त्यामुळे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. मात्र, प्रत्येकाने ठरावीक वेळीच पाणी प्यावे असा वैद्यकीय नियम नाही.

२. जवळ पाण्याची बाटली ठेवा : काम करताना किंवा घरातील कामांमध्ये व्यस्त असताना पाणी पिणे विसरले जाते. त्यामुळे जवळ पाण्याची बाटली ठेवा आणि ठरावीक अंतराने पाणी प्या.

३. पाण्याचे प्रमाण असलेले पदार्थ खा : संत्री, काकडी यांसारखी फळे आणि भाज्या तसेच सूप यांचा आहारात समावेश करा. यामधूनही शरीराला द्रवपदार्थ मिळण्यास मदत होते.

४. व्यायाम करताना पाणी प्या : हिवाळ्यात घाम कमी येत असला तरी व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी होऊ शकते. त्यामुळे व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर गरजेनुसार पाणी प्या.

५. लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या : लघवीचा रंग आणि तिचे प्रमाण यावरून शरीरातील पाण्याच्या स्थितीचा अंदाज येऊ शकतो. मात्र, काही औषधे, पदार्थ आणि आरोग्याच्या समस्या यामुळेही रंग बदलू शकतो.

कोणत्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी?

वयोवृद्ध व्यक्तींना तहान कमी जाणवू शकते. त्यामुळे त्यांनी पाणी पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्ती, लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे घेणारे आणि ताप, उलट्या किंवा जुलाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही पाण्याची कमतरता होण्याचा धोका अधिक असू शकतो. अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्रवपदार्थांचे सेवन करावे.

लक्षात ठेवा : सकाळी उठल्यावर पाणी पिणे ही चांगली सवय असली तरी दिवसभर पुरेसे पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे. थंडीमध्ये तहान कमी लागते म्हणून पाण्याचे सेवन कमी करू नका. तुमच्या शरीराची गरज, दैनिक हालचाली आणि आरोग्यस्थितीनुसार पाणी पिण्याचे प्रमाण ठरवा.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते. या माहितीच्या अचूकतेची किंवा परिणामांची नवशक्ती हमी देत नाही. किडनी किंवा हृदयाशी संबंधित आजार असल्यास पाणी पिण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.)

आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीतून मोठी गॅसगळती; १ किमी परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, Video

भारतात अश्लील अन् हिंसक कंटेंटला लगाम; मेटाकडून Instagram च्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल

दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Mumbai : विरार-चर्चगेट लोकलमध्ये राडा; दोन प्रवाशांच्या भांडणात भिरकावलेला चाकू लागून भलताच प्रवासी जखमी, आरोपी अटकेत

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी