'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

World Vada Pav Day : तिखट-झणझणीत खायचंय? मग 'ठेचा वडा पाव' नक्की ट्राय करा; वाचा सोपी रेसिपी

हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबिरीपासून तयार केलेला ठेचा आणि बटाट्याच्या मिश्रणाची ही जोडी वडा पावची चव आणखी भन्नाट करते.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची खास ओळख असलेला वडा पाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. आज २३ ऑगस्ट, वर्ल्ड वडा पाव डेनिमित्त नेहमीच्या वडा पावला थोडा तिखट, झणझणीत आणि हटके ट्विस्ट द्यायचा असेल, तर ठेचा वडा पाव नक्की ट्राय करा. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबिरीपासून तयार केलेला ठेचा आणि बटाट्याच्या मिश्रणाची ही जोडी वडा पावची चव आणखी भन्नाट करते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी चटपटीत पदार्थांची आवड असणाऱ्या चाहत्यांसाठी खास आहे.

साहित्य :

ठेच्यासाठी

  • १२ ते १५ हिरव्या मिरच्या

  • १० ते १२ लसूण पाकळ्या

  • पाऊण कप भाजलेले शेंगदाणे

  • १ कप कोथिंबीर

  • अर्धा टीस्पून मीठ किंवा चवीनुसार

बटाट्याच्या मिश्रणासाठी

  • २ उकडलेले बटाटे

  • दीड टेबलस्पून तयार ठेचा

  • २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा

  • १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

  • अर्धा टीस्पून मीठ किंवा चवीनुसार

वडा पावसाठी

  • पाव

  • चीज स्लाइस

  • बटर

  • तयार बटाट्याचे मिश्रण

कृती :

१. झणझणीत ठेचा तयार करा - सुरुवातीला हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि मीठ घ्या. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट न करता जाडसर वाटून घ्या. ठेच्याचा अस्सल स्वाद आणि टेक्स्चर टिकवण्यासाठी तो थोडा जाडसरच ठेवा.

२. बटाट्याचे मिश्रण तयार करा - उकडलेले बटाटे एका भांड्यात घेऊन चांगले कुस्करून घ्या. त्यात तयार केलेला ठेचा, चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या.

३. पावाला बटर लावा - पाव मधून कापून त्यावर थोडे बटर लावा. तवा गरम करून पाव दोन्ही बाजूंनी हलका भाजून घ्या. त्यामुळे पावाला छान क्रिस्पीपणा येईल आणि बटरचा स्वादही जाणवेल.

४. बटाट्याचे मिश्रण भरा - भाजलेल्या पावाच्या एका बाजूवर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवा. त्यावर चीज स्लाइस ठेवा.

५. चीज वितळू द्या - तवा मंद आचेवर ठेवून तयार वडा पाव काही क्षण झाकून ठेवा. चीज हलके वितळले की गॅस बंद करा. पाव जास्त भाजला जाणार नाही याची काळजी घ्या.

६. गरमागरम सर्व्ह करा - तयार ठेचा वडा पाव गरमागरम सर्व्ह करा. सोबत उरलेला हिरवा ठेचा, चटणी किंवा तळलेली हिरवी मिरची दिल्यास चव आणखी खुलते.

टिप्स :

  • ठेचा तयार करताना मिरचीचे प्रमाण आपल्या तिखटाच्या आवडीनुसार कमी-जास्त करा.

  • शेंगदाणे आधी भाजून घेतल्यास ठेच्याला अधिक छान चव आणि सुगंध येतो.

  • ठेचा अगदी बारीक पेस्ट करण्याऐवजी जाडसर वाटल्यास त्याची अस्सल टेक्स्चर टिकून राहते.

  • बटाट्याच्या मिश्रणात मीठ घालताना ठेच्यातील मीठ लक्षात घेऊनच प्रमाण ठरवा.

  • चीज वापरताना पाव जास्त वेळ तव्यावर ठेवू नका अन्यथा पाव कडक होऊ शकतो.

  • अधिक तिखट आणि झणझणीत चव हवी असल्यास सर्व्ह करताना वरून थोडा अतिरिक्त ठेचा घालू शकता.

'वर्ल्ड वडा पाव डे'च्या निमित्ताने नेहमीच्या वडा पावपेक्षा काहीतरी हटके खायचं असेल, तर हा झणझणीत ठेचा वडा पाव घरच्या घरी नक्की करून पाहा!

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके