कधीकाळी 'दंगलींचे शहर' अशी नकोशी ओळख असलेल्या मालेगाव शहरात साधारणतः १७ वर्षांपूर्वी घडलेल्या बॉम्बस्फोटाने अवघा देश हादरला होता. मालेगाव हे मुस्लिमबहुल शहर असल्याने इथे कमालीची संवेदनशीलता जाणवत असते. नव्वदीच्या दशकापर्यंत या शहराने अनेक दंगली अनुभवल्या. हिदू-मुस्लिमांतील संघर्ष कधी सुप्त तर कधी उघड पद्धतीने उफाळून आल्यानंतर त्याचा परिपाक दंगलींमध्ये झाल्याचे जुने-जाणते समाजधुरीण सांगतात. २००८ मधील बॉम्बस्फोट हा इथल्या संवेदनशीलतेने गाठेलेला कळस मानला जातो.
२९ सप्टेंबर २००८.. मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोटाने अवघे शहर हादरले. रमजानमध्ये मुस्लीम लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाल्याने त्याची देशभर चर्चा झाली या स्फोटामध्ये सहा जणांच्या शरीराच्या चिंधड्या उडून त्यांचा मृत्यू झाला स्फोटाच्या आगीत होरपळल्याने जखमी झालेल्यांची संख्या शंभरहून अधिक होती. घटनास्थळी आढळलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने संशयाची सुई हिंदुत्ववाद्यांकडे वळली. स्वाभाविकच पोलिसांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ३० सप्टेंबर २००८ रोजी स्थानिक आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी कलम ३०७, ३०२, ३२६, ३२४, ४२७, १५३ -अ, १२० -ब या कलमांनुसार स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
'या' हिंदुत्ववाद्यांवर संशय व्यक्त...
हा नरसंहारी बॉम्बस्फोट घडवण्यामागे साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा यामागे हात होता अशी माहिती समोर आली होती. या सर्वांतील समान धागा म्हणजे त्यांची हिदुत्त्ववादी विचारसरणी. त्याचाच एक भाग म्हणून या बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली आणि तिची यथायोग्य अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा वहीम या सर्वांवर होता. एनआयएने सात आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली होती.
गत १७ वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. प्रारंभी 'एटीएस' कडे असलेला हा तपास कालांतराने 'एनआयए'कडे वर्ग करण्यात आला. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नसल्यामुळे एनआयए विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.