अलिबाग : जिल्हा परिषदेमध्ये गेली ५ वर्षे जिल्हा परिषद रायगड येथील पाणीपुरवठा विभागाच्या क्लार्क, कर्मचारी नाना कोरडेने वेतनच्या माध्यमातून सरकारी पैशाचा अपहार केला असल्याची माहिती आ. महेद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही रक्कम जवळपास ४ कोटी १९ लाख असल्याचे त्यांनी सांगितले. याची सखोल चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दळवी यांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेमधील पाणीपुरवठा विभागात नाना कोरडे हा कर्मचारी क्लार्क म्हणून काम करतो तेथील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन काढण्याचे काम त्याचाकडे आहे. याचाच फायदा घेत कोरडेने ६ कर्मचाऱ्यांच्या नावे पगाराव्यतिरिक्त अधिकची रक्कम दरमहा काढून आपल्या स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या खात्यात जमा करीत असल्याचे समोर आले आहे.
साधारणपणे ६ ते ८ कोटींचा गैरप्रकार झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला असल्याचे आ. दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारी पैशाचा गैरवापर होणे हे उचित नाही लोक्प्रनिधी म्हणून त्यावर माहिती घेण्याचा माझा अधिकार असल्याचे आमदार दळवी यांनी म्हटले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी याबाबत पत्रकरांशी संवाद साधताना सांगितले की, मार्च महिना असल्याने इन्कमटॅक्सचे मोजमाप सुरू असताना पगाराव्यतिरिक्त काही अतिरिक्त रक्कम जवळपास ६ ते ७ लाख काढली गेली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मागील ३ वर्षापासून वेगवेगळ्या कर्मचाऱ्याच्या नावावर रक्कम काढल्याचे समोर आल्यानंतर त्याबाबत चौकशी केली असता नाना कोरडे याने कोणत्याही अधिकाऱ्याला विश्वासात न घेता बिडीओचा पासवर्ड वापरून हा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी १ कोटी १९ लाखाचा अपहार झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत त्यांनी ज्या ठिकाणी काम केले आहे, त्या विभागातही सखोल चौकशी करण्यात येत आहे.
याप्रकरणी समिती गठीत
या गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी डेप्यूटी लेखाधिकारी महादेव रेळे, लेखाधिकारी सतीश घोळवे, सहा. लेखाधिकारी समीर धर्माधिकारी, क्लार्क पराग खोत आणि नितीन खरमाटे यांची समिती गठीत करण्यात आली आहे. येत्या ६ ते ७ दिवसात चौकशी पूर्ण करून जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोरडे यांना निलंबन करण्यात आल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरडेने दोन दिवसांत १ कोटी १९ लाखापैकी ६८ लाख भरले असल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले.