पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी ड्रग्ज व अमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील ‘एल ३’ हॉटेलमधील पार्टीत ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये, चक्क हॉटेलमधील वॉशरूममध्ये टॉयलेटजवळ बसून काही अल्पवयीन मुले ड्रग्ज घेत असल्याचे दिसून आले. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेन ड्रग्ज असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.
दोन पोलिसांचे निलंबन
पुण्यातील अंमली पदार्थप्रकरणी पोलीस दलातील दोन बिट मार्शलना निलंबित करण्यात आले आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याशिवाय संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे.
पोलिसांनी या हॉटेलमधील २ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. गेल्या काही महिन्यांत पुण्यात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये ड्रग्जचे साठे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते.
दरम्यान, पुणे पोलीस ‘एल ३’ हॉटेल सील करण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई केली जाणार आहे. तपासात पार्टी येथेच झाल्याचे उघड झाल्याची माहिती मिळत आहे.
शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे
या प्रकरणावरून राजकारण तापले असून सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित एक्साईज अधिकारी कोट्यवधींचा हप्ता घेत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.