महाराष्ट्र

नांदेडचे ५५ माजी नगरसेवक भाजपमध्ये; खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश

पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केले

Swapnil S

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या ५५ माजी नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

स्वतः चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून ही माहिती दिली. त्यानंतर विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या ५२ माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर शुक्रवारपासून अनेक नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, तर काही नगरसेवकांनी शनिवारी झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. चव्हाण यांच्या उपस्थितीतच या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आतापर्यंत निवडून आलेले व स्वीकृत मिळून एकूण ५५ नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आले होते. पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे स्वागत व अभिनंदन केले. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता