आदित्य ठाकरे, संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

राज्यसभा निवडणुकीत मविआत कोणताही तिढा नाही! आदित्य ठाकरे यांनी केले स्पष्ट

राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील महाविकास आघाडीत सुरू असलेल्या चर्चामध्ये कोणताही तिढा निर्माण झाला नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. आगामी राज्यसभा निवडणुकीतील एकमेव जिंकण्याजोगी जागा संख्याबळाच्या आधारे शिवसेना ठाकरे गटालाच मिळायला हवी, असा ठाम दावाही त्यांनी केला.

Swapnil S

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील महाविकास आघाडीत सुरू असलेल्या चर्चामध्ये कोणताही तिढा निर्माण झाला नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. आगामी राज्यसभा निवडणुकीतील एकमेव जिंकण्याजोगी जागा संख्याबळाच्या आधारे शिवसेना ठाकरे गटालाच मिळायला हवी, असा ठाम दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यसभेसाठीच्या चर्चामध्ये कोणताही तिढा नाही. सर्व पक्षांमध्ये संवाद सुरू आहे. राज्यसभेच्या जागेसाठी आम्ही आमचा दावा मांडला आहे. संख्याबळ आणि महाविकास आघाडीने ठरवलेल्या रोटेशन पॉलिसीनुसार ही जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवायला हवी."

शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनीही सांगितले की, १६ मार्चच्या निवडणुकीपूर्वी एकमेव राज्यसभा जागेसाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना (उबाठा) ची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, माजी खासदार राजन विचारे आणि विनायक राऊत यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. राजन विचारे आणि विनायक राऊत यांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

'आघाडीतील घटक पक्षांमध्ये सातत्याने चर्चा सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत ती सुरू राहील. प्रमुख नेत्यांमध्येही संवाद सुरू आहे,' असे राऊत यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या (उबाठा) प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादी (शप) च्या फौजिया खान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे रामदास आठवले, भाजपचे भागवत कराड, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील पाटील यांचा राज्यसभा कार्यकाळ संपत आहे.

सत्ताधारी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने महाविकास आघाडीला राज्यसभेत आणि विधानपरिषदेत प्रत्येकी केवळ एकच सदस्य निवडून आणता येऊ शकतो. ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्यास इच्छुक असल्याचे राऊत यांनी सांगितले. याबाबत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शप) नेते जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवसेना (उबाठा) हा प्रादेशिक पक्ष असल्याने राज्यसभेत किमान दोन प्रतिनिधी असावेत, अशी पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

CJP Protest Delhi : जागा सोडू नका; मनोज जरांगे यांचा सल्ला

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण