महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे ७ लाख वाहने धावली! २४ तासात सुमारे ८० हजार वाहनांची ये-जा

दीड दिवसासह पाच व सहा दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणातील चाकरमान्यांना मुंबईला घेऊन निघालेल्या एसटी बस, कार, रिक्षा, इको, मोटारसायकल, छोट्या मोठ्या बसेस व विविध प्रकारच्या वाहनांची अत्यंत वेगवान वर्दळ दिसून आली आहे.

अरविंद गुरव

पेण: दीड दिवसासह पाच व सहा दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणातील चाकरमान्यांना मुंबईला घेऊन निघालेल्या एसटी बस, कार, रिक्षा, इको, मोटारसायकल, छोट्या मोठ्या बसेस व विविध प्रकारच्या वाहनांची अत्यंत वेगवान वर्दळ दिसून आली आहे. परंतु रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतुकीच्या नियोजनपूर्ण व्यवस्थेमुळे यावर्षी तुरळक ठिकाणे सोडता कुठेही तासनतास अडकणाऱ्या वाहतूककोडींचा सामना गणेशभक्तांना करावा लागला नाही.

रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या या वाहनांची नोंद झाली असून १० दिवसांत अंदाजे ७ लाख गाड्या सुसाट धावल्याचे चित्र पहावयास मिळाले. २४ तासाला सरासरी ८० हजार वाहने मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा झाली आहेत. या दरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रायगडसह कोकणातील पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. महामार्गावरून गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदीनुसार आजपर्यंत दहा दिवसांत अंदाजे सात लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत.

बाप्पाच्या विसर्जनानंतर शनिवारी पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणाऱ्या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. दिवस रात्रभर सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटेपर्यंत सुरूच होता.

परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी वाहतूककोंडी होऊ नये व गणेशभक्तांना आपल्या गणरायाच्या दर्शनाला वेळेत पोहोचता यावे, तसेच गौरी-गणपती सण साजरा करून चाकरमानी पुन्हा मुंबई, ठाणे, पनवेल, गुजरातच्या दिशेने जाता यावेत यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्वाची खबरदारी घेतली आहे.

गेल्या दहा दिवसांत किमान ८ हजार एसटी बसेसमधून साधारण ५ लाखांहून अधिक चाकरमानी मुंबईहून कोकणात व कोकणातून पुन्हा ठाणे, मुंबईच्या दिशेने आले असून. छोट्या-मोठ्या असंख्य खासगी बसेस, कार, टेम्पो, इको, रिक्षा मोटारसायकल आदीच्या सोयीनुसार लाखो गणेशभक्तांनी ये-जा केली आहे.

गुजरातसह मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आपल्या कोकणातील गावी आले होते. त्यामुळे महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूककोंडी विना व्हावा, याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणाऱ्या अंदाजे ५० हून अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे.

- पोलीस प्रशासन, रायगड

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल बनला द्विशतकी विक्रमादित्य! अनेक विक्रमांना गवसणी; कोहली, सचिनचा रेकॉर्डही मोडला

चीनकडून नव्या डावपेचांची आखणी