महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेनंतर आता मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ठाण्याजवळ अवजड वाहनाचा अपघात

मुंबई–नाशिक महामार्गावर ठाण्यातील रुस्तमजी कॉम्प्लेक्सजवळ आज पहाटे एका मोठ्या मालवाहू ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अवजड ट्रक बाजूला काढण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

Krantee V. Kale

ठाणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्ववत होत नाही तोच आता मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई–नाशिक महामार्गावर ठाण्यातील रुस्तमजी कॉम्प्लेक्सजवळ एका मोठ्या मालवाहू ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अवजड ट्रक बाजूला काढण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास अवजड मालवाहू ट्रकचा रुस्तमजी संकुलासमोर अपघात झाला. ट्रक महामार्गावरच मधोमध आडवा झाल्यामुळे वाहतूक मंदावली. रुस्तमजी संकुलासमोर कोंडीमुळे मोठा ‘बॉटलनेक’ तयार झाल्याने माजिवडा जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या अपघाताचा सर्वाधिक फटका नाशिक आणि भिवंडीहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे.

प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा - पोलिसांचे आवाहन

ठाणे वाहतूक पोलीस घटनास्थळी तैनात असून अपघातग्रस्त वाहन हटवण्याचे काम सुरू आहे. ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तोपर्यंत नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा आणि घोडबंदर मार्ग किंवा ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नागरिकांचा संताप

विशेष म्हणजे, याआधी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ३२ तास चाललेली वाहतूक कोंडी ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. मुंबई–नाशिक महामार्ग सध्या चार लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरणाच्या कामातून जात असून, बांधकाम आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे हा मार्ग सतत ‘डोकेदुखी’ ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वारंवार होणारे अपघात आणि तासन्‌तास चालणारी वाहतूक कोंडी पाहता, या मार्गावरील सुरक्षितता आणि नियोजनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

बालकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल कवच’ आवश्यक; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

ई-रिक्षा व ई-बाइकसाठी परवाना बंधनकारक; मोटार वाहन विभागाकडे करावी लागणार नोंदणी