महाराष्ट्र

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

निष्ठावंत कार्यकर्ता अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उद्देशून आर्त स्वरात विनवणी करताना ऐकू येतो. या व्हिडिओमुळे अजित पवार यांचे बारामतीशी आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Krantee V. Kale

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज (दि.२९) त्यांच्या कर्मभूमी बारामतीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाणार आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेरचा एक भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'दादा'ला I Love You सांग...

व्हिडिओत अजित पवारांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता अक्षरशः ढसाढसा रडताना ऐकू येतोय. हा समर्थक, कॅमेऱ्यावर दिसत नसला तरी, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उद्देशून आर्त स्वरात विनवणी करताना ऐकू येतो. “दादा ला ‘I Love You’ सांग… पार्थ दादा… दादा ला ‘I Love You’ सांग रे पार्थ दादा…” असा वारंवार आक्रोश करत तो हंबरडा फोडतो. या वेळी पार्थ पवार मेडिकल कॉलेजच्या गेटजवळ उभे राहून वडिलांच्या अंत्ययात्रेसंदर्भातील तयारी पाहताना दिसतात. ते समर्थकाकडे हात हलवून प्रतिसाद देतात, त्यानंतर गेट बंद करण्यात येतो. मात्र, गेट बंद झाल्यानंतरही तो समर्थक अश्रू अनावर होऊन आक्रोश करत राहतो. या व्हिडिओमुळे अजित पवार यांचे बारामतीशी आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बारामतीत शोकसागर

बुधवारी दादांच्या अपघाताची बातमी समजताच बारामतीकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली होती. अनेक कार्यकर्ते आणि नागरिक धाय मोकलून रडत होते, तर काही जण एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडताना दिसले. संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आज आपल्यात नाही, ही भावना बारामतीकरांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली. सन १९९१ पासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत या परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले होते. केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावरही त्यांची मजबूत पकड होती. दिवसभर बारामती मेडिकल कॉलेज तसेच विद्या प्रतिष्ठान परिसरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी करत दादांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, अजित पवारांच्या अंत्यसंस्कारांसाठी बारामतीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, राज्यासह देशभरातील अनेक मान्यवर, नेते आणि नागरिक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

सुभाषचंद्र बोस ते अजित पवार : विमान अपघातांत देशाने गमावलेले राजकीय नेते

यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ! एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश

Ajit Pawar Death : 'दादा' गेले; महाराष्ट्र हळहळला! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू

Ajit Pawar Death : 'घड्याळा'नेच अजितदादांची ओळख पटली - प्रत्यक्षदर्शी

Ajit Pawar Plane Crash : सुमित कपूर, शांभवी पाठक, विदीप जाधव, पिंकी माळी यांच्यावर काळाचा घाला