"दादा माझे दैवत होते, माझ्या घरी गणपतीत जेवायला आले होते. २०१३ मध्ये शासनातून निवृत्त झालो तरीही मी आजपर्यंत दादांसोबतच काम करत होतो. काल (मंगळवार, दि.२७) सकाळी ७:३० वाजता दादा मुंबईच्या बंगल्याहून निघाले आणि थोड्याच वेळात हा दुर्दैवी प्रकार घडला. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील सर्वस्व गेल्यासारखं वाटतंय", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चालक श्यामराव नारायण मनवे (वय ७१) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण रात्रीच कारने बारामतीला जाऊ असे दादांना सांगितले होते, पण दादांनी ऐकले नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
बातमी टीव्हीवर झळकली अन् मी सुन्न झालो
श्यामराव हे जानेवारी १९९९ पासून अजित पवारांचे चालक. ज्यावेळी अजित पवारांच्या अपघाताची बातमी झळकली तेव्हा ते मुंबईत दादांच्या 'देवगिरी' बंगल्यावरच होते. माध्यमांशी बोलताना श्यामराव म्हणाले की, अजित दादांचा मृत्यू झाल्याची बातमी टीव्हीवर झळकली तेव्हा थोडावेळ सुन्न झालो होतो. विश्वासच बसत नव्हता, काहीच कळत नव्हतं.
दादांनी माझं ऐकलं असतं तर...
"मंगळवारी मुंबईतील बैठका लवकर संपल्यामुळे आपण रात्रीच कारने बारामतीला जाऊ असे मी दादांना सुचवले होते. पण, त्यांनी नकार दिला. तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्यात येतो, असे ते मला म्हणाले. सकाळी ७:३० वाजता दादा या बंगल्यावरून निघाले, त्यांना सोडायलाही मी गेलो होतो आणि थोड्याच वेळात ही दुर्दैवी घटना घडली. दादांनी त्यावेळी माझं ऐकलं असतं तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडलीच नसती", असे म्हणताना श्यामराव यांचा अश्रूंचा बांध फुटला. पुढे बोलताना त्यांनी अजितदादा स्वभावाने कडक होते, पण मनाने तेवढेच चांगले होते. कधी भेदभाव करत नव्हते. जे असेल ते सर्वांना वाटून खात असत. एका लाडूचेही चार भाग करत. आता काही सूचत नाही, माझं आयुष्यच थांबलंय, सर्वस्व गमावल्यासारखं वाटतंय, असे सांगितले.
अजित पवारांचा अपघात
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये आयोजित केलेल्या ४ जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार बुधवारी पहाटे मुंबईहून खासगी चार्टर्ड विमानाने निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाजवळ सकाळी ८.४५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि अजित पवारांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.